उपकमांडरसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; वर्षभरात ३४ जणांनी सोडली नक्षलींची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 07:05 PM2019-12-31T19:05:35+5:302019-12-31T19:05:41+5:30

नववर्षाच्या पूर्वसंध्येला (दि.३१) गडचिरोली पोलिसांना नक्षलविरोधी अभियानात पुन्हा एक यश मिळाले.

The surrender of five Naxals with the sub-commander | उपकमांडरसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; वर्षभरात ३४ जणांनी सोडली नक्षलींची साथ

उपकमांडरसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; वर्षभरात ३४ जणांनी सोडली नक्षलींची साथ

Next

गडचिरोली : नववर्षाच्या पूर्वसंध्येला (दि.३१) गडचिरोली पोलिसांना नक्षलविरोधी अभियानात पुन्हा एक यश मिळाले. एक प्लाटून उपकमांडर व तीन महिलांसह एकूण पाच जणांनी शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत नक्षल चळवळीचा त्याग केला. त्या सर्वांवर मिळून २७ लाख रुपयांचे बक्षीस होते.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्या पाचही जणांना पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ  देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग आणि मनिष कलवानिया प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी माहिती देताना पो. अधीक्षक बलकवडे म्हणाले, पोलिसांनी जिल्हाभरात आदिवासी बांधवांकरिता जनजागरण मेळावे, शांती मेळावे, ग्रामभेटी तसेच नवजीवन योजनेंतर्गत गावोगावी भेटी दिल्या. त्यात जे तरुण-तरुणी नक्षल दलममध्ये भरती झाले आहेत त्यांच्या घरी जाऊन नक्षल चळवळीमुळे त्यांचे कसे नुकसान होत आहे आणि पोलीस दल त्यांच्यासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी करू शकते हे पटवून दिले. त्यामुळे या वर्षभरात ३४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात २ डीकेएसझेडसी मेंबर, १ दलम कमांडर, ४ सदस्य, २ पार्टी मेंबर आणि १३ समर्थकांचा समावेश आहे. त्या सर्वांवर १ कोटी ८० लाख रुपयांचे बक्षीस होते, असे त्यांनी सांगितले.

आत्मसमर्पण करणा-यांची कारकीर्द
१) अजय उर्फ मनेसिंग फागुराम कुळयामी - हा एप्रिल २००७ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला होता. जुलै २०१६ पासून प्लाटून क्रमांक ३ मध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १९ गुन्हे, खुनाचे १२, जाळपोळीचे ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ५.५० लाखांचे बक्षीस होते.
२) राजो उर्फ गंगा उर्फ शशिकला सोमजी तुलावी- ही २००८ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली. जुलै २०१५ पासून प्लाटून क्रमांक ३ मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ८ गुन्हे, खुनाचे २ तर जाळपोळीचे २ गुन्हे आहेत. तिच्यावर ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते.
३) सपना उर्फ रुखमा दोनू वड्डे- ऑक्टोबर २००६ मध्ये चातगाव दलममध्ये भरती झाली. २०१२ पासून ती प्लाटून क्रमांक १५ मध्ये सदस्य होती. तिच्यावर चकमकीचे १२, खुनाचे ४ तर जाळपोळीचे ४ गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते.
४) गुन्नी उर्फ बेहरी उर्फ वसंती मनकेर मडावी- डिसेंबर २००७ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली. २०१३ मध्ये टिपागड दलमच्या पीपीसीएम या पदावर तिची पदोन्नती झाली. नंतर २०१५ पासून कंपनी क्र.१० च्या सदस्यपदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे २ गुन्हे असून ५ लाख ७५ हजार रुपयांचे बक्षीस होते.
५) सुनील उर्फ फुलसिंग सुजान होळी- जुलै २००८ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला. फेब्रुवारी २०१३ पासून कंपनी क्र.१० मध्ये सदस्यपदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १२ गुन्हे, खुनाचे ४, जाळपोळीचे ३ तर  अपहरणाचे २ गुन्हे आहेत. त्याच्यावर ५ लाख ७५ हजारांचे बक्षीस होते.

Web Title: The surrender of five Naxals with the sub-commander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.