साडेचार लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचे आत्मसमर्पण
By संजय तिपाले | Published: June 10, 2024 06:51 PM2024-06-10T18:51:15+5:302024-06-10T18:51:33+5:30
माओवादी बॅनर व पत्रके लावण्याचा तसेच जंगलात स्फोटके पुरुन ठेवल्याचे दोन गुन्हेही त्याच्या नावावर आहेत.
गडचिरोली : साडेचार लाखांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके (रा. नेलगुंडा ता. भामरागड) याने १० जून रोजी पोलिस व केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण केले. त्यामुळे माओवादी चळवळीला आणखी एक धक्का बसला आहे. २०१४ मध्ये किशोर कन्नाके हा जनमिलिशिया सदस्य म्हणून भामरागड दलममध्ये भरती होऊन २०१५ पर्यंत कार्यरत होता. २०१५ मध्ये डीएकेएमएस (दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना) मध्ये अध्यक्ष पदावर पदोन्नती होऊन सन २०१८ पर्यंत कार्यरत राहिला. २०१८ मध्ये आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) सदस्य म्हणून त्याने कामाला सुरुवात केली व २०२२ पर्यंत जबाबदारी सांभाळली. २०२२ पासून तो भामरागड दलम सदस्य व आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) च्या अध्यक्ष पदावर पदोन्नती होऊन कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे तीन गुन्हे नोंद आहेत. २०१७ मध्ये दरबा पहाडी जंगल परिसर, २०२१ मध्ये कोपर्शी जंगल व २०२२ मध्ये पेनगुंडा जंगलातील दंगलीत त्याचा सहभाग होता. जाळपोळीचे चार गुन्हे त्याच्या नावावर आहेत. माओवादी बॅनर व पत्रके लावण्याचा तसेच जंगलात स्फोटके पुरुन ठेवल्याचे दोन गुन्हेही त्याच्या नावावर आहेत.
चार खुनांचा आरोप
जहाल माओवादी किशोर कन्नाकेवर चार खुनांचा आरोप आहे. २०१५ मध्ये मल्लमपड्डूर तलावाजवळील रोडवर झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.२०१८ मध्ये मध्ये मौजा गोंगवाडा टी-पॉइंट जवळ निरपराध व्यक्तीच्या खुनाचाही त्याच्यावर आरोप होता. २०१९ मध्ये मौजा जूवी नाल्याजवळ झालेल्या एका निरपराध इसमाच्या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.२०२३ मध्ये मौजा पेनगुंडा ते गोंगवाडाकडे रोडवर झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात तो सामील होता.
अडीच वर्षांत १५ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण
सन २०२२ ते आतापर्यंत १५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्यासाठी नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक जगदीश मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल हे प्रयत्न करत आहेत.