शस्त्र चालविणाऱ्या ‘रजनी’ला मिळाले ‘स्वातंत्र्य’; आत्मसमर्पित तरुणीची शेतकऱ्याशी रेशीमगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 09:33 AM2024-08-17T09:33:40+5:302024-08-17T09:34:57+5:30

रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी असे आत्मसमर्पित तरूणीचं नाव

Surrender 'Rajni' got freedom as A young woman ties a silk knot with a farmer | शस्त्र चालविणाऱ्या ‘रजनी’ला मिळाले ‘स्वातंत्र्य’; आत्मसमर्पित तरुणीची शेतकऱ्याशी रेशीमगाठ

शस्त्र चालविणाऱ्या ‘रजनी’ला मिळाले ‘स्वातंत्र्य’; आत्मसमर्पित तरुणीची शेतकऱ्याशी रेशीमगाठ

लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली: वयाच्या १४व्या वर्षी ‘ती’ नक्षल चळवळीकडे भरकटली. वह्या, पेन घेऊन आयुष्य घडविण्याऐवजी तिच्या हाती शस्त्र आले अन् सुरू झाला हिंसेचा थरारक प्रवास. १४ वर्षांत सदस्य ते एरिया कमिटी मेंबर (एसीएम) अशी मजल मारल्याने नावापुढे जहाल नक्षलवादी हा शिक्का बसलाच, पण आयुष्यही दिशाहीन झाले. वर्षभरापूर्वी तिने शस्त्र खाली ठेवले व आत्मसमर्पणाची वाट निवडली. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पोलिसांच्या पुढाकाराने एका शेतकरी तरुणाने तिच्याशी  लग्नाची रेशीमगाठ बांधली अन् सुरू झाला तिच्या ‘स्वातंत्र्या’चा प्रवास.

रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी (२८, रा. इरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम, जि. बिजापूर, छत्तीसगड) असे या आत्मसमर्पित तरूणीचं नाव. कैलास मारा मडावी (२६, रा. एलाराम,  देचलीपेठा, ता. अहेरी) या शेतकरी तरुणाने तिला आयुष्यभरासाठी पत्नी म्हणून स्वीकारले.

नातेवाइकांच्या बैठकीत दोघांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनीही त्यांना प्राेत्साहन दिले. १६ ऑगस्ट रोजी  शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरात पोलिस अधीक्षक   नीलोत्पल, अपर  अधीक्षक यतीश देशमुख यांच्या साक्षीने पारंपरिक रीतीरिवाजाप्रमाणे विवाह समारंभ पार पडला.  आत्मसर्मपण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल, विविध शाखांचे प्रभारी व अंमलदार यांनी या सोहळ्यात परिश्रम घेतले. महिला माओवादी रजनी उर्फ कलावती वेलादी हिने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर महाराष्ट्र व छत्तीसगड शासन असे मिळून एकूण ११ लाख रुपयांचे बक्षीस होते. तब्बल १४ वर्षे रजनी ही माओवादी चळवळीत कार्यरत होती.  खून,, शासकीय बसची जाळपोळ, अशा सहा गंभीर गुन्ह्यांत तिचा सहभाग होता.

वैवाहिक जीवनाला आडकाठी

नक्षल चळवळीत लग्न करण्यास विरोध केला जातो. महिला नक्षलवाद्यांवर वरिष्ठ अन्याय, अत्याचार करतात. त्यास कंटाळून अनेक जहाल महिला माओवादी आत्मसमर्पण करून सामान्यांप्रमाणे आयुष्य जगत आहेत, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

Web Title: Surrender 'Rajni' got freedom as A young woman ties a silk knot with a farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.