सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, एकूण ३२.५ लाखांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 10:36 PM2019-07-27T22:36:33+5:302019-07-27T22:36:58+5:30
पोलिसांच्या नवजीवन योजनेनुसार यावर्षी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आता १४ झाली आहे.
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या दलममध्ये कार्यरत असणा-या सहा नक्षलवाद्यांनी शनिवारी (दि.२७) गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात एका डीव्हीसी रँकच्या नक्षली नेत्यासह ४ महिलांचाही समावेश आहे. हे सर्वजण विविध घातपाती कारवायांमध्ये सहभागी होते. पोलिसांच्या नवजीवन योजनेनुसार यावर्षी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आता १४ झाली आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या उपस्थितीत पत्रकारांपुढे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना पांढरा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. ते सर्वजण गडचिरोली जिल्ह्यातीलच रहिवासी असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे आत्मसमर्पित नक्षलीपैकी एक महिला गरोदर आहे. तिच्या पतीबाबत चौकशी अजून बाकी असून त्याचाही माग काढला जाईल असे सांगण्यात आले.
यावर्षी जहाल नक्षली नेता नर्मदाक्का व तिच्या पतीला पोलिसांनी अटक केल्यानंतर नक्षलवाद्यांचे मनोबल खचले आहे. अशात पोलिसांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळे नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण दिवसेंदिवस वाढत असल्याचे बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आत्मसमर्पित नक्षलवादी आणि त्यांची कारकिर्द
-डीव्हीसी गोकुल उर्फ संजू सन्नू मडावी (३०) हा नोव्हेंबर २००५ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाला होता. २०१३ मध्ये कंपनी क्र.४ मध्ये पीपीसीएम तर २०१७ पासून तो डीव्हीसी पदावर काम करीत होता. त्याच्यावर १५ चकमकींचे गुन्हे, ३ खुनाचे आणि ६ ब्लास्टिंगचे गुन्हे आहेत. शासनाने त्याच्यावर ८ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
-रतन उर्फ मुन्ना भिकारी कुंजामी (२२) हा सप्टेंबर २०१४ मध्ये सांड्रा दलममध्ये झाला. जानेवारी २०१५ पासून एप्रिल २०१९ पर्यंत प्लाटून क्र.११ मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर छत्तीसगड राज्यात दोन चकमकींचे गुन्हे आहेत. त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते.
-सरिता उर्फ मुक्ती कासा कल्लो (२०) ही नोव्हेंबर २०१३ मध्ये भामरागड दलममध्ये भरती झाली. नोव्हेंबर २०१४ पासून ती कंपनी क्र.४ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर रस्त्याच्या कामावरील वाहनांच्या जाळपोळीसह ३ चकमकीचे गुन्हे आहेत. तिच्यावरही ५ लाखांचे बक्षीस होते.
-शैला उर्फ राजे मंगळू हेडो (२०) ही जानेवारी २०१८ मध्ये गट्टा दलममध्ये भरती झाली. त्यानंतर भामरागड दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर ३ चकमकीचे, १ खुनाचा तर ३ जाळपोळीचे गुन्हे आहेत. तिच्यावर ४.५० लाखांचे बक्षीस होते.
-जरीना उर्फ शांती दानू होयामी (२९) ही आॅगस्ट २०१४ मध्ये गट्टा दलममध्ये भरती झाली. २००७ पासून भामरागड दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर ८ चकमकीसह एकूण १९ गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर ५ लाखांचे बक्षीस होते.
-मिना धुर्वा (२२) ही जानेवारी २०१८ मध्ये गट्टा दलममध्ये भरती झाली. एप्रिल २०१८ पासून भामरागड दलम मध्ये कार्यरत होती. तिच्यावर शासनाने ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
नक्षल सप्ताहाला विकास सप्ताहाने उत्तर
दरवर्षी २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताह पाळल्या जातो. यादरम्यान आतापर्यंत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शेतीसह सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांकडून केले जाते. परंतू त्याला न जुमानता नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलिसांच्या वतीने याच काळात आदिवासी विकास सप्ताहाचे आयोजन केले आहे. शासनाच्या विविध योजना आदिवासीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण योजनेतून आपले जीवन सुखकर करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.