एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:09 AM2018-05-25T01:09:05+5:302018-05-25T01:09:05+5:30
एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांनी चळवळीला रामराम करीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या तिघांवर एकूण आठ लाख रूपयांचे बक्षीस होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एक महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांनी चळवळीला रामराम करीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या तिघांवर एकूण आठ लाख रूपयांचे बक्षीस होते.
रजिता ऊर्फ सिरोंती माधुराम कुरचामी (२६), जितेंद्र ऊर्फ परदेशी बाजीराव पदा (२१), तिरूपती ऊर्फ पेंटा सुरा वेलादी (२०) असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे नावे आहेत. रजिता कुरचामी ही एप्रिल २०१० मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली. आॅगस्ट २०११ पासून २०१५ पर्यंत ती चातगाव दलममध्येच कार्यरत होती. तिचा एकूण सहा पोलीस-नक्षल चकमकीत सहभाग असून दोन खून व एक जाळपोळ केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने दोन लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. जितेंद्र पदा हा जानेवारी २०१७ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला. मार्च २०१८ पर्यंत दलम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर दोन लाख रूपयांचे बक्षीस होते. तिरूपती वेलादी हा जून २०१६ मध्ये अहेरी दलममध्ये भरती झाला. आॅक्टोबर ते मे २०१८ पर्यंत कंपनी क्र. १० च्या सदस्यपदावर कार्यरत होता. त्याचा एका पोलीस-नक्षल चकमकीत सहभाग आहे. त्याच्यावर चार लाख रूपयांचे बक्षीस होते. या सर्वांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्ष डॉ. महेश्वर रेड्डी, ए.राजा यांच्या समोर आत्मसमर्पण केले.
पोलीस विभागाने आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आत्मसमर्पीतांना भूखंड, आर्थिक मदत, रोजगाराची उपलब्धतता, नसबंदी रिओपनिंग यामुळे आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढत आहे. २०१७-१८ यावर्षात एकूण ३५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पीतांकडून प्रेरणा घेऊन लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी दलममध्ये कार्यरत असलेले आणखी काही सदस्य आत्मसमर्पण करतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.