कोरोना नियंत्रणासाठी प्रत्येक घरात सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:00 AM2020-09-16T05:00:00+5:302020-09-16T05:00:20+5:30

वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, सोसायटी-वसाहतीमध्ये घ्यावयाची काळजी, दुकाने-मंडी-मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना, कार्यस्थळी-कार्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी व खाजगी-सार्वजनिकरित्या प्रवास करताना घ्यावयाची काळजी याबाबतची सविस्तर माहिती नागरिकांना या मोहिमेद्वारे देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी आपली अचूक माहिती आलेल्या पथकातील सदस्यांना द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Survey in every home for corona control | कोरोना नियंत्रणासाठी प्रत्येक घरात सर्वेक्षण

कोरोना नियंत्रणासाठी प्रत्येक घरात सर्वेक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाचा निर्णय : ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविली जात असून त्यात जिल्ह्यातील प्रत्येक घरात जाऊन सर्व्हेक्षण आणि आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. १५ सप्टेंबर तर २५ ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेला नागरिकांनी आणि प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.
जिल्ह्यातील नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैलीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तिंना प्रेरीत करणे, आरोग्य शिक्षण देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून त्यांची आरोग्य तपासणी, त्याचबरोबर प्राणवायू पातळी तपासणे, आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, कोविड-१९ चे संशयित रु ग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे व आरोग्याविषयी जागृती करणे या बाबी मोहिमेत राबविल्या जाणार आहेत.
वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, सोसायटी-वसाहतीमध्ये घ्यावयाची काळजी, दुकाने-मंडी-मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना, कार्यस्थळी-कार्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी व खाजगी-सार्वजनिकरित्या प्रवास करताना घ्यावयाची काळजी याबाबतची सविस्तर माहिती नागरिकांना या मोहिमेद्वारे देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी आपली अचूक माहिती आलेल्या पथकातील सदस्यांना द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

कशासाठी राबविली जाणार ही मोहीम?
कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

ही मोहिम वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत आवश्यक त्रिसुत्रीवर आधारित असणार आहे. त्यात सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा नियमित व योग्य वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे तसेच निर्जंतुकीकरणाचा योग्य वापर करणे या बाबातचे महत्व नागरिकांना या मोहिमेत पटवून दिले जाणार आहे.

प्रत्येक कुटुंबासाठी महत्वाच्या बाबी
रोज सकाळी शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी आॅक्सिमीटरद्वारे मोजून घ्यावी. हे आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे. मास्कचा सदैव वापर करावा, मास्क काढून ठेवू नये, याबाबत कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांविषयी काळजी घ्यावी. सॅनिटाझरची लहान बाटली सदैव सोबत बाळगावी. त्याचा गरजेनुसार उपयोग करत राहावा. पुरेसा आहार, पुरेशी झोप, व्यायाम, योगा, प्राणायाम आदिव्दारे रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवावी. जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्व, प्रथिने अशा सर्व पोषक बाबींनी युक्त पदार्थ जेवणात असावेत. बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे स्वच्छ धुवून ठेवावेत. नातेवाईक, मित्रांकडे जाणे टाळावे. बाजारपेठेत खरेदीला जाताना सुरिक्षत अंतर पाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करताना मौन राखावे. सहप्रवाशांशी विनाकारण बोलू नये. गर्दीचा प्रवास टाळावा. कमीत कमी ठिकाणी स्पर्श करावा. या सर्व बाबी जीवनशैलीचा भाग म्हणून अंगिकारावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Survey in every home for corona control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.