जीवन व्यवहारातील मराठी व इंग्रजी शब्दांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:24 AM2021-07-08T04:24:41+5:302021-07-08T04:24:41+5:30
आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथील भाषा विभागातर्फे प्राचार्य डॉ. ...
आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथील भाषा विभागातर्फे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे जैवविविधता नोंदवही अंतर्गत कार्य करण्यासाठी भाषा विभागातील पी.बी.आर. विद्यार्थी गटाच्या वतीने दत्तक ग्राम पळसगाव येथे जीवनव्यवहारातील मराठी व इंग्रजी शब्दांचे सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणांतर्गत शिक्षण, कृषी, आरोग्य, राजनीती, वाहतूक, धार्मिक विधी अशा विविध क्षेत्रात वापरले जाणारे मराठी व इंग्रजी शब्द आणि त्याच्या पर्यायी शब्दांचा शोध घेण्यात आला. दिवसेंदिवस ग्रामीण भागात प्रचलित असणारे शब्द लोप पावत आहेत. त्यामुळे शब्दांच्या आणि एकूण भाषेच्या लोपत्वामुळे समाज आणि संस्कृतीचा नवीन पिढीला विसर पडत आहे. समाज संस्कृतीच्या जतन होण्याच्या दृष्टीने भाषिक संवर्धन होण्याची अत्यंत गरज आहे आणि त्याच हेतूने सदर सर्वेक्षण करण्यात आले व विविध क्षेत्रात जीवन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या व लोप पावण्याच्या वाटेवर असणाऱ्या मराठी व इंग्रजी शब्दांचा तथा पर्यायी शब्दांचा शोध घेण्यात आला. याप्रसंगी गावातील विविध गटात मोडणाऱ्या व्यक्तींची भेट घेण्यात आली व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे त्यांच्याकडून शब्दसंग्रहाची माहिती घेण्यात आली.
सर्वेक्षणावेळी इंग्रजी विभागप्रमुख प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. डॉ. विजय रैवतकर, प्रा. स्नेहा मोहुर्ले, प्रा. अनिल राऊत, प्रा. वैभव पडोळे, पीबीआरचे विद्यार्थी सारंग नखाते, युगांतर भोयर, ज्ञानदीप मोहुर्ले, योगेंद्र वैद्य, अमित काळे, गोपाल घोडाम, राहुल घोडाम, देवानंद भोयर, सायली ढोरे आदी उपस्थित होते.