मामा तलावाच्या कामाची पाहणी
By admin | Published: May 25, 2017 12:40 AM2017-05-25T00:40:56+5:302017-05-25T00:40:56+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागात बुधवारी दौरा करून मेंढेबोडी व वडेगाव येथे सुरू असलेल्या....
नियोजन अचूक ठेवण्याचे निर्देश : मुख्य कार्यकारी अधिकारी मेंढेबोडी व वडेगावात पोहोचले
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागात बुधवारी दौरा करून मेंढेबोडी व वडेगाव येथे सुरू असलेल्या तलावाच्या पुनरूजीवनाच्या कामाची पाहणी केली. तलावातील जलसाठ्यात वाढ होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीसाठी सिंचन सुविधा मिळाली पाहिजे, त्यामुळे या कामाला नियोजन अचूक असावे, असे निर्देश शांतनू गोयल यांनी जि. प. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
यावेळी जि. प. सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता पी. एल. गजघाटे, शाखा अभियता एच. ए. गोन्नाडे, एम. जी. बन्सोड, संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सज्जनपवार आदी उपस्थित होते. मामा तलावाचे पुनरूजीवन अभियानाअंतर्गत आरमोरी तालुक्यातील मेंढेबोडी व वडेगाव येथे तलाव खोलीकरण व बळकटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे काम सुरू आहे. भाजपप्रणीत राज्य सरकारने टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच सिंचन क्षेत्र वाढविण्याकरिता मामा तलाव व खोलीकरण बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. यामध्ये वेस्टवेअर, मासे टँक, कालवा व खोलीकरण आदी कामांचा समावेश आहे.
सीईओंचे वृक्षपे्रम
तलाव खोलीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल मेंढेबोडी येथे पोहोचले. दरम्यान यावेळी तलावाच्या पाळीवर एक मजूर कुऱ्हाडीने मोठे झाड तोडत होता. यावर सदर झाड कुणी तोडायला सांगितले, अशी चौकशी करून झाड तोडण्यास त्यांनी मजुराला रोखले. तलावाच्या पाळीची स्वच्छता करण्याच्या नावाखाली मोठे झाडे तोडू नका, अशा सूचना शांतनू गोयल यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. सदर प्रकारावरून जि. प. सीईओंचे वृक्षप्रेम दिसून आले.