डिझेल मेक्यानिकमध्ये देसाईगंजचा सुशील हेडावू देशातून प्रथम; दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते हाेणार सत्कार
By दिगांबर जवादे | Published: September 13, 2022 04:45 PM2022-09-13T16:45:31+5:302022-09-13T16:46:38+5:30
सुशीलचे विद्यालयीन शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाच्या काॅमर्स शाखेतून पूर्ण झाले.
देसाईगंज (गडचिराेली) : औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथील सुशील हेडावू हा युवक डिझेल मेक्यानिक या ट्रेडमध्ये देशातून प्रथम आला आहे. त्याला ९९ टक्के गुण मिळाले आहेत. ८ सप्टेंबर राेजी निकाला लागला असून १७ सप्टेंबर राेजी दिल्ली येथे हाेणाऱ्या दिक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते त्याचा सत्कार केला जाणार आहे.
सुशीलचे विद्यालयीन शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाच्या काॅमर्स शाखेतून पूर्ण झाले. बारावीनंतर देसाईगंज येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत डिझेल मेक्यानिक या ट्रेडमध्ये प्रवेश घेतला. ८ सप्टेंबर राेजी लागलेल्या निकालानुसार सुशिलला ६०० पैकी ५९४ गुण (९९ टक्के) मिळाले असून ताे देशातून प्रथम आला आहे.
नुतन शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जयदीश शर्मा, सचिव मोतीलाल कुकरेजा यांनी सुशीलचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. आयटीआयचे प्राचार्य विकास आडे यांनीही कौतुक केले आहे. सुशील हा देशातून प्रथम आल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालणालय मुंबईचे संचालक दिगंबर दळवी यांनी देसाईगंज आयटीआयचे प्राचार्य यांना कळविली आहे.