पं.स.सदस्यांचे उपोषण स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:25 PM2019-05-27T22:25:18+5:302019-05-27T22:25:31+5:30
स्थानिक पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्या मनमानी कारभाराबाबत गडचिरोली पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य २८ मे मंगळवारपासून उपोषण करणार होते. दरम्यान सोमवारी जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या कक्षात आ.डॉ.देवराव होळी यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्या मनमानी कारभाराबाबत गडचिरोली पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य २८ मे मंगळवारपासून उपोषण करणार होते. दरम्यान सोमवारी जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या कक्षात आ.डॉ.देवराव होळी यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. दरम्यान नागपूरच्या विभागीय आयुक्तांना चौकशीचा अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती सीईओंनी दिल्यानंतर पं.स.पदाधिकारी व सदस्य शांत झाले.
या सर्व सदस्यांनी मंगळवारपासून आयोजित उपोषण स्थगीती करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बैठकीला जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, पं.स.सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, जि.प.सदस्य रमाकांत ठेंगरी, पं.स.सदस्य मारोतराव इचोडकर, नेताजी गावतुरे, रामरतन गोहणे, मालता मडावी, सुषमा मेश्राम, जास्वंदा गेडाम, मधुकर भांडेकर आदी उपस्थित होते.
बीडीओ कुणाल उंदीरवाडे यांच्यावर पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु बीडीओ उंदीरवाडे यांचा प्रभार काढण्यावर पदाधिकारी ठाम होते. दरम्यान आ.डॉ.देवराव होळी व जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. उंदीरवाडे यांचा प्रभार काढण्यात यावा, अशी माहिती त्यांनी आयुक्तांना दिली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी उंदीरवाडे यांचा प्रभार लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने २८ मे पासून होणारे उपोषण सध्या मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती पं.स.उपसभापती विलास दशमुखे यांनी दिली. या सभेदरम्यान पंचायत समिती स्तरावरील विविध विकास कामांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.