अविश्वास प्रस्तावावर सस्पेन्स कायम
By admin | Published: October 12, 2015 01:44 AM2015-10-12T01:44:20+5:302015-10-12T01:44:20+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेत बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार व पशुसंवर्धन व कृषी सभापती अजय कंकडालवार यांच्याविरूध्द ....
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार व पशुसंवर्धन व कृषी सभापती अजय कंकडालवार यांच्याविरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या अविश्वास प्रस्तावावर सस्पेन्स कायम आहे.
अविश्वास प्रस्तावावर १३ आॅक्टोबर रोजी मतदान करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासाठी लागणारे ३४ सदस्यांचे संख्याबळ पूर्ण झाले असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे व भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. तर अतुल गण्यारपवार व अजय कंकडालवार यांनीही आपल्याकडे २० ते २२ सदस्यांचे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हा परिषदेत १२ सदस्य आहेत व हा जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा गट आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी व काँग्रेसचे गटनेते केसरीपाटील उसेंडी यांनी व्हिप जारी करून विशेष सभेला उपस्थित राहू नये, असे आदेश पक्षाच्या सदस्यांना दिले आहे. ठरावाच्या विरोधात मतदान करावे व पक्षादेश न मानणाऱ्या सदस्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही बजाविले आहे. दरम्यान नाग विदर्भ आंदोलन समितीचे जि.प. सदस्य व भारतीय जनता पक्ष मिळून संख्याबळ १५ च्या जवळपास जाणारे आहे.
भारतीय जनता पक्षाने गण्यारपवार व कंकडालवार यांच्या अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यासाठी सदस्यांना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सदस्य अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने मतदान करतील, असे आता स्पष्ट झाले आहे. अविश्वास प्रस्ताव संमत करण्यासाठी ३४ सदस्यांची गरज आहे. तर अविश्वास प्रस्ताव बारगळण्यासाठी १७ सदस्य गैरहजर राहणे आवश्यक आहे. दोन्ही पक्षाने व्हीप जारी केला असल्यामुळे पक्षादेश झुगारणाऱ्या सदस्यांवर कारवाईचा बडगा उभा राहू शकतो व पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास सदर व्यक्ती अपात्र ठरविला जातो. त्यामुळे सदस्यांची गोची होणार आहे. काँग्रेसचे सदस्य एकत्र राहिल्यास हा अविश्वास प्रस्ताव बारगळण्याची चिन्ह अधिक आहे.
मात्र दोन्ही गट आपापल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा करीत असल्याने या अविश्वास प्रस्तावाबाबत संभ्रमाची स्थिती अद्यापही कायम आहे. जवळजवळ ३० पेक्षा अधिक सदस्य तिर्थाटनासाठी रवाना झाले होते. त्यांचेही आगमन सोमवारी होणार आहे. त्यामुळे मंगळवारी सभागृहातच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. मात्र काँग्रेस पक्षाने हा अविश्वास प्रस्ताव बारगळला जाईल, असा ठाम दावा केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)