रेतीघाट लिलाव प्रक्रियेला स्थगिती
By admin | Published: October 29, 2015 01:55 AM2015-10-29T01:55:27+5:302015-10-29T01:55:27+5:30
जिल्हा प्रशासनाच्या वतीने २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील एकूण ६८ योग्य रेतीघाट लिलावासाठी पात्र ठरविण्यात आले होते.
उच्च न्यायालयाचे आदेश : ६८ घाटांचा होणार होता लिलाव
गडचिरोली : जिल्हा प्रशासनाच्या वतीने २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील एकूण ६८ योग्य रेतीघाट लिलावासाठी पात्र ठरविण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने सदर लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या लिलाव प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेती घाटांची लिलाव प्रक्रिया तुर्तास रखडली आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तालुकास्तरावरील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी रेती घाट पात्र ठरविण्यापूर्वी संपूर्ण रेती घाटाची पाहणी करतात. त्यानंतर कोणता रेती घाट उपश्याकरिता योग्य आहे याची यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर करतात. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सदर रेती घाटांची मंजुरी मिळविण्यासाठी तसा प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण विभागाकडे पाठविला जातो. जिल्हा प्रशासनाने २०१५-१६ वर्षासाठी जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील एकूण ६८ रेतीघाट योग्य ठरविले आहेत. यामध्ये सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुकडीगुड्डा, मद्दीकुंठा, प्राणहिता नदीवरील टेकडाताला, अहेरी तालुक्यातील प्राणहिता नदीवरील महागाव बु., वांगेपल्ली, चिचगुंड्डी या रेती घाटांचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील बांडे नदीवरील आलदंडी, सेवारी, भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीवरील भामरागड, मुलचेरा तालुक्यातील येल्ला, चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील मुधोली, गणपूर रै., इल्लुर, तळोधी मो., दोटकुली, मोहोर्ली मो., एकोडी, कुरूड, जोगना, घारगाव, पारडी देव व मुरमुरी आदी १२ रेती घाटांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील बांधोना चिचोली, गडचिरोली तालुक्यातील खुर्सा-कुरखेडा, कठाणी नदी घाट, खरपुंडी, आंबेशिवनी, कनेरी, पारडीकुपी, साखरा, राखी, शिवणी, पुलखल, विहीरगाव व बोदली माल आदी १३ घाटांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, आमगाव, सावंगी, विर्शीतुकूम, विसोरा, कोकडी, कोंढाळा मेंढा आदी ८ रेती घाटांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील मंजूर करण्यात आलेल्या रेती घाटांमध्ये वैरागड-विहीरगाव, वैरागड-कोरपना, हिरापूर रिठ, मेंढा, मांगदा, अरसोडा, वघाळा, किटाळी, डोंगरसावंगी, डोंगरगाव भु., रामपूर चक, शिवणी बु., सायगाव व कुलकुली आदी १५ रेती घाटांचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील सहा रेती घाट लिलाव प्रक्रियेसाठी मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये सती नदीवरील मोहगाव, घाटी, कुरखेडा-कुंभीटोला, कुरखेडा, पुराडा व मालेवाडा आदी रेती घाटांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षाकरिता ६८ रेती घाटांची लिलाव प्रक्रिया राबवायची होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेती घाट लिलाव प्रक्रियेला २७ आॅक्टोबर रोजी मंगळवारी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- ओंकारसिंग भौंड, जिल्हा खनिकर्म अधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली