पोलिस खबरी असल्याचा संशय, नक्षल्यांकडून निष्पाप व्यक्तीची हत्या
By संजय तिपाले | Published: July 31, 2024 04:52 PM2024-07-31T16:52:19+5:302024-07-31T16:54:03+5:30
भामरागड हादरले: आठवडाभरातील दुसरी घटना, परिसरात दहशत
संजय तिपाले
गडचिरोली : पोलिस खबरी असल्याच्या संशयावरुन आणखी एका निष्पाप व्यक्तीची नक्षल्यांनी हत्या केली. ही घटना भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम मीरगुडवंचा येथे ३० जुलै रोजी रात्री घडली. सध्या नक्षल सप्ताह सुरु असून आठवडाभरात दोन निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्याने तालुका हादरला आहे.
लालू मालू धुर्वा (४०,रा. मीरगुडवंचा ता. भामरागड) असे मयताचे नाव आहे. तो एका पोलिस अंमलदाराचा नातेवाईक आहे. २८ जुलैपासून ३ ऑगस्टपर्यंत नक्षल सप्ताह सुरु आहे. यात पोलिस जवानांवर हल्ला, भूसुरुंग स्फोट, खंडणी वसुली, निष्पाप नागरिकांच्या हत्या अशी कामे नक्षली करतात. नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला आरेवाडा (ता. भामरागड) येथे जयराम कोमटी गावडे (४०) या आत्मसमर्पित नक्षल्याची गोळ्या झाडून हत्या करत नक्षल्यांनी दहशत निर्माण केली होती. त्यानंतर ३० जुलै रोजी रात्री मीरगुडवंचा येथे लालू धुर्वा यास झोपेतून उठवून गावाबाहेर नेले व तेथे कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून संपविले. एकाच आठवड्यात नक्षल्यांनी दोन निष्पाप नागरिकांची हत्या केल्याने परिसरात दहशत पसरली आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला. माओवादी चळवळीला बीमोड होत आहे, त्यामुळे नैराश्येतून ते या कृती करत आहेत. परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले असल्याचे त्यांनी सांगितले.
मृतदेहाजवळ सोडली चिठ्ठी
दरम्यान, मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक चिठ्ठी सोडली, त्यात लालू धुर्वा हा पोलिसांचा खबरी होता, त्याच्यामुळे आम्हाला एकदा कॅम्प सोडून जावे लागले होते, असा उल्लेख आहे. या चिठ्ठीवर पिपल्स लिबरेशन गुर्रिला पार्टी असा उल्लेख आहे. ही चिठ्ठी ताब्यात घेऊन भामरागड पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.