मिठाई विक्रेते अपडेट, मात्र ग्राहक अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:00 AM2020-10-23T05:00:00+5:302020-10-23T05:00:26+5:30
दसरा, दिवाळीच्या सणात तसेच विविध कार्यक्रमांमध्ये पेढे, मिठाई, लाडू आदी गाेड पदार्थांचा वापर सर्वाधिक केला जाताे. अनेकदा दुकानदार भेसळ पेढे अथवा मिठाई किंवा मुदतबाह्य पदार्थ विक्री करतात. अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्यास दुकानदारांचे फावते. ग्राहकांची फसवणूक व दिशाभूल हाेऊ नये, यासाठी १ ऑक्टाेबरपासून ‘बेस्ट बिफाेर’ नियम सुरू करण्यात आला. यानुसार मिठाईच्या ट्रेसमाेर किंवा काऊंटरवर पदार्थाजवळ संबंधित पदार्थ किती दिवसात खावे याचा उल्लेख असणे बंधनकारक आहे.
गाेपाल लाजुरकर ।
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : दूध, साखर, खवा, बेसन आदीपासून तयार केलेेल्या विक्रीच्या पदार्थांचा याेग्य दर्जा राखला जावा, ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक हाेऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या अन्न व औषध विभागाने १ ऑक्टाेबरपासून मिठाई व पेढ्यांच्या दुकानांसाठी नियमावली लागू केली. यानुसार मिठाईच्या ट्रेसमाेर किंवा काचेच्या काऊंटरवर ‘बेस्ट बिफाेर’ लिहिणे आवश्यक आहे. या नियमावलीबाबत विक्रेते व ग्राहक किती जागरूक आहेत, याबाबत रिॲलिटी चेक केले असता, गडचिराेली शहरातील विक्रेत्यांना नियमाबाबत माहिती आहे. मात्र ग्राहक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
दसरा, दिवाळीच्या सणात तसेच विविध कार्यक्रमांमध्ये पेढे, मिठाई, लाडू आदी गाेड पदार्थांचा वापर सर्वाधिक केला जाताे. अनेकदा दुकानदार भेसळ पेढे अथवा मिठाई किंवा मुदतबाह्य पदार्थ विक्री करतात. अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्यास दुकानदारांचे फावते. ग्राहकांची फसवणूक व दिशाभूल हाेऊ नये, यासाठी १ ऑक्टाेबरपासून ‘बेस्ट बिफाेर’ नियम सुरू करण्यात आला. यानुसार मिठाईच्या ट्रेसमाेर किंवा काऊंटरवर पदार्थाजवळ संबंधित पदार्थ किती दिवसात खावे याचा उल्लेख असणे बंधनकारक आहे. गडचिराेली शहरातील सात मिठाईच्या दुकानांना भेट देऊन बेस्ट बिफाेर या नियमाची माहिती आहे का, याबाबत दुकानदारांची विचारणा केली असता, सर्वच दुकानदारांनी नियम माहित असल्याचे सांगितले. परंतु विविध ठिकाणच्या २५ ग्राहकांना या नियमाबाबत विचारणा केली असता, ते याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे गडचिराेली अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील नाेंदणीकृत मिठाई विक्रेत्यांची बैठक घेऊन शासनाच्या नवीन ‘बेस्ट बिफाेर’ नियमाची माहिती आधीच दिली हाेती. याचा परिणाम शहरातील मिठाई विक्रेत्यांवर झाला. त्यांनी आपापल्या दुकानांमध्ये विशिष्ट मिठाई, पेढ्यांसमाेर ‘बेस्ट बिफाेर’ लिहून किती दिवसात मिठाई खायची, याचा उल्लेख केला आहे. दिवाळी सणात लाडू व पेढ्यांना सर्वाधिक मागणी असते. त्यानुसार आवश्यकतेप्रमाणे दुकानांमध्ये मिष्टांनांचा साठा असल्याचे रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले.
दुकानदारांना नियम पाळण्याचा सूचना दिल्या
काेणते पदार्थ किती दिवस वापरायचे हे सर्वस्वी संबंधित दुकानदारावर अवलंबून असते. पदार्थाच्या दर्जानुसार शासनाच्या ‘बेस्ट बिफाेर’ नियमावलीप्रमाणे जिल्ह्यातील मिठाई विक्रेत्यांना स्वच्छता व नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने क्षेत्रभेटी देऊन तपासणीही केली जात आहे. -एस.पी.ताेरेम, अन्न सुरक्षा, अधिकारी
आवश्यक तेवढ्याच पदार्थांवर भर
‘बेस्ट बिफाेर’ या सूचनेचा पदार्थाच्या ट्रेसमाेर उल्लेख असणे, हा नियम ग्राहकांसाठी अत्यंत चांगला आहे. या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक हाेणार नाही. अनेक गाेड पदार्थ अल्पकाळ टिकणारे असल्याने आवश्यक तेवढेच पदार्थ बनविण्यावर आपण भर देत आहाेत. त्यामुळे पदार्थ वाया जात नाही. -अतुल पटेल, मिठाई विक्रेता