शेळीचा बळी अन् वाघीण अडकली; महिलेचा बळी घेणारी टी- १३ वाघीण जेरबंद
By गेापाल लाजुरकर | Published: October 23, 2023 04:38 PM2023-10-23T16:38:40+5:302023-10-23T16:38:57+5:30
३ दिवसात रेस्क्यू टीमने जंगलात पकडले
गडचिराेली : रामाळा शेतशिवारात मजूर महिलेचा बळी घेणाऱ्या टी-१३ या वाघिणीला वन विभागाच्या ताडाेबा येथील टीमने साेमवारी सकाळी ८ वाजता रवी नियत क्षेत्रात जेरबंद केले. तीन दिवसाच्या शाेधमाेहिमेनंतर रेस्क्यू टीमला यश मिळाले. आरमाेरी तालुक्याच्या रवी नियत क्षेत्रातील १२/१ मधील जंगल परिसरात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पशुैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व शूटर अजय मराठे यांच्या रेस्क्यू टीमने अचूक अंदाज घेत वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केले.
रामाळा-वैरागड रस्त्यालगतच्या जंगल परिसरात गेल्या महिनाभरापासून वाघाचा वावर आहे. या परिसरात तीन वाघ वावरत हाेते. सध्या दाेन वाघ अजूनही या भागात वावरत आहेत. १९ ऑक्टोबरला रामाळा येथील एका शेत शिवारात धान कापणी करणाऱ्या ताराबाई एकनाथ धोडरे या महिला मजुराचा टी-१३ वाघिणीने बळी घेतला होता. या घटनेने शेतकरी तसेच परिसरातील नागरिक धास्तावले होते.
गडचिरोलीचे वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वडसा वनविभागाचे उपवसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक संदीप भारती, आरमोरीचे परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्र सहायक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक अजय उरकुडे, आनंद साखरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे (वन्यजीव), शूटर अजय मराठे, आर.आर.टी.सदस्यांनी ही माेहीम राबविली.
शेळीचा बळी अन् वाघीण अडकली
लाेकांच्या मागणीनुसार ताडोबा व गडचिरोली येथून रेस्क्यू टीम बोलवण्यात आली. सदर टीम गेल्या तीन दिवसांपासून वाघाला जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम राबवत हाेती. वाघाचा वावर असेलल्या परिसरात २५ ट्रॅप कॅमेरे लावून वाघाचे लाेकेशन शाेधले जात हाेते. विशेष म्हणजे, रविवारी अरसोडा-रवी जंगल परिसरात एका शेळीला ठार केले होते. त्यामुळे ती पुन्हा येईल म्हणून तेथे ट्रॅप कॅमेरे लावले हाेते. तसेच बेटसुद्धा ठेवला हाेता.
वाघिणीची रवानगी गाेरेवाड्याला
सोमवारी पहाटे ४ वाजेपासून वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व रेस्क्यू टीमने पहारा देत सापळा रचला. सकाळी ८ वाजताच्या दरम्यान टी-१३ वाघीण येताच तिची ओळख पटवून शूट करून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर वाघीण जेरबंद झाली. वाघिणीला वडसा वन विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. टी-१३ वाघिणीला नागपूर येथील गोरेवाडा येथे नेण्यात येणार आहे.