ताडपल्ली उपकेंद्रातील परिचारिकेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:18 PM2018-02-05T23:18:31+5:302018-02-05T23:18:49+5:30
प्राथमिक उपकेंद्र ताडपल्ली येथे कार्यरत असलेल्या रंजना तुळशीराम वेलादी (२४) या आरोग्य सेविकेने गावातील शासकीय निवासस्थानी रविवारी रात्री हिवतापाच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली.
आॅनलाईन लोकमत
एटापल्ली : प्राथमिक उपकेंद्र ताडपल्ली येथे कार्यरत असलेल्या रंजना तुळशीराम वेलादी (२४) या आरोग्य सेविकेने गावातील शासकीय निवासस्थानी रविवारी रात्री हिवतापाच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. तिला एटापल्ली येथील रूग्णालयात रात्री ११ वाजता आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
रंजनाने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र गेल्या आठवडाभरापासून ती कुठल्यातरी कारणाने अस्वस्थ होती अशी चर्चा आरोग्य कर्मचाºयांमध्ये आहे. चर्चेनुसार रविवार दि.२८ जानेवारीला पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान केंद्रावर एक आरोग्य अधिकारी आले होते. त्यानंतर तिथे पोलिओ मोहिमेतील इतर पथकही पोहोचले. आरोग्य कर्मचाºयांमधील चर्चेनुसार तेव्हापासूनच ती अस्वस्थ राहात होती. त्यामुळे तिथे नेमके काय झाले याचा तपास होणे गरजेचे आहे.
रंजना ही पाच वर्षांपासून एटापल्ली तालुक्यात कार्यरत होती. तिचे वडील एटापल्ली पं.स.त परिचर पदावर कार्यरत आहेत. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.