तहसीलचा कारभार वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:03 AM2018-05-26T01:03:01+5:302018-05-26T01:03:01+5:30
तहसील कार्यालयामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र तहसील कार्यालयाच्या विविध विभागाचे कर्मचारी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून गप्पा, गोष्टीत टाईमपास करीत असल्याने एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तहसील कार्यालयामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र तहसील कार्यालयाच्या विविध विभागाचे कर्मचारी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून गप्पा, गोष्टीत टाईमपास करीत असल्याने एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एटापल्ली तहसील कार्यालयाचा कारभार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.
याबाबतचा प्रकार प्रस्तुत प्रतिनिधीला बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दिसून आला. प्रतिनिधींनी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली असता, एटापल्ली तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना, निवडणूक, आस्थापना आदी विभागातील अनेक कर्मचारी आपल्या खुर्च्या सोडून पुरवठा विभागात गप्पा मारत बसले होते. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालयात खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास बंदी असताना येथील कर्मचारी खर्रा खात असल्याचे दिसून आले.
विद्यमान सरकार गतिमान असल्याचा दावा सत्ताधारी नेते करीत आहेत. मात्र विविध शासकीय विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे व विभाग प्रमुखांचे नियंत्रण राहिले नसल्याने प्रशासकीय कामाची दिरंगाई प्रचंड वाढली आहे. परिणामी विद्यमान सरकारचा गतिमान प्रशासन व शासन असल्याचा दावा फोल ठरला आहे.
निराधार योजनेचे अनेक लाभार्थी तहसील कार्यालयात कामासाठी येतात. तसेच इतर विभागातही अनेक लोक तालुक्याच्या दुर्गम भागातून येतात. मात्र संबंधित कर्मचारी आपल्या खुर्च्यांवर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते.