टेलर, गवंड्यांना नाही मिळणार १५ हजार रुपयांचे साधन किट !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 04:10 PM2024-08-02T16:10:03+5:302024-08-02T16:11:11+5:30
प्रतिदिन विद्यावेतनासह प्रमाणपत्र : प्रशिक्षण काळात दिला जायचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. पंतप्रधान विश्वकर्मा योजना समाजातील विविध १८ व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय करताना अर्थसाहाय्य व्हावे यासाठी राबविली जात आहे; परंतु टेलर आणि गवंडी लाभार्थ्यांना प्रशिक्षण काळात प्रतिदिन ५०० रुपयांचे विद्यावेतन, प्रमाणपत्र आणि साधने घेण्यासाठी १५ हजार रुपयांचा लाभ देण्यास स्थगिती दिली आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जातो. ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास विभागाकडे आली आहे. त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी करतात.
पीएम विश्वकर्मा योजना
काय आहे विश्वकर्मा योजना?
पीएम विश्वकर्मा योजना समाजातील पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी सुरु केलेली आहे. या योजनेंतर्गत समाजातील सर्व जातींना प्रशिक्षणासह कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दोन टप्प्यात दिले जाते कर्ज
स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत एक लाख ते तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाते. यावर ५ टक्के व्याज असून, तीन लाख रुपयांची ही रक्कम एक लाख व दोन लाख अशा दोन टप्प्यांत दिली जाते.
निवडीचे निकष काय?
अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे त्याचे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिकांनाच मिळणार आहे. अर्ज करणारी व्यक्ती एकतर कुशल कारागीर किंवा कारागीर असणे आवश्यक आहे.
गवंडी, टेलरला स्थगिती
गवंडी कामे व टेलरची कामे करणारी व्यक्ती ही आधीच प्रशिक्षित असते. त्यामुळे या व्यक्तींना प्रशिक्षण देणे व साहित्य खरेदीसाठी लाभ देण्यास सध्या स्थगिती आहे.
लाभ काय?
प्रतिदिन ५०० रुपये विद्यावेतन
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एक आठवड्यापर्यंत मोफत प्रशिक्षण दिले जाते. याकरिता त्यांना ५०० रुपये प्रतिदिन विद्यावेतन दिले जाते.
प्रमाणपत्र
संबंधित लाभार्थ्यांना एक आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाते. परंतु, आता टेलर व गवंडी यांना हे प्रमाणपत्र देण्यावर स्थगिती आलेली आहे.
व्यवसाय साधन खरेदीसाठी १५ हजार
लाभार्थ्याने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला त्याच्या पारंपरिक व्यवसायासाठी साधने, किट खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते.
अधिकारी म्हणतात..
"पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत टेलर व गवंडी यांना प्रशिक्षण काळात विद्यावेतन, प्रमाणपत्र आणि साधने खरेदीसाठी लाभ देण्याबाबत स्थगिती आल्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले नाही, असे नगर परिषदेतील एका अधिकाऱ्याने सांगितले"