आंदोलनकर्त्यांवरील कारवाई मागे घ्या
By admin | Published: November 7, 2016 01:49 AM2016-11-07T01:49:53+5:302016-11-07T01:49:53+5:30
वन, वन्यजीव, गौणउपज व पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याकरिता जनहितवादी युवा समिती, विविध ग्रामसभा, सूरजागड बचाव संघर्ष समिती,
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी : महिलांची एटापल्ली पोलीस ठाण्यावर धडक
एटापल्ली : वन, वन्यजीव, गौणउपज व पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याकरिता जनहितवादी युवा समिती, विविध ग्रामसभा, सूरजागड बचाव संघर्ष समिती, अहेरी जिल्हा कृती समिती, व्यापारी संघटना, पक्ष व संस्थांच्या वतीने नागरिकांच्या सहभागातून सूरजागड लोह प्रकल्प व मुख्य प्रोसेसिंग प्लँट संबंधाने आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनकर्त्यांवर पोलीस कारवाई करण्यात आली. आंदोलनात सहभागी जनता गोरगरीब असून या आंदोलनकर्त्यांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी महिलांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे एटापल्ली ठाणेदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
विविध संघटनांच्या महिलांनी शुक्रवारी एटापल्ली पोलीस ठाण्यावर धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदारांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या विकासात्मक व न्याय आहेत. मुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी बुर्गी पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी सूरजागड पहाडीवरील एक दगडसुद्धा बाहेर जिल्ह्यात नेऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र काही दिवसांतच काम सुरू करून ट्रकांवर येथील माल बाहेर जिल्ह्यात नेणे सुरू करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाचा स्थानिक जनतेला कुठलाही उपयोग होणार नाही, त्यामुळे येथील काम थांबवून प्रकल्पाची लिज रद्द करावी व आंदोलनकर्त्यांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली. निवेदन ठाणेदार पाटील यांनी स्वीकारले. निवेदन देताना रूपा पुसाली, रेणूका बोरूले व महिला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)