अल्पवयीनांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:41 AM2021-08-14T04:41:43+5:302021-08-14T04:41:43+5:30
देसाईगंज : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ...
देसाईगंज : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
मुद्रा कर्जाचा लाभ नाही
काेरची : बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्यासाठी ‘मुद्रा लोन योजना’ या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रावर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र, या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हेमाडपंथी शिव मंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते.
पर्जन्यमापक वास्तूची दुरुस्ती करा
सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. नदीच्या काठावर असलेल्या सिरोंचा शहराला इंग्रजाच्या कालावधीपासून महत्त्व आहे.
डास व कीटकांपासून आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व किटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील नाल्या तसेच डबक्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी हाेत आहे.
वनहक्क प्रकरणे रखडली
सिरोंचा : वनहक्क कायद्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून वनहक्क प्रदान केला जातो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना अजूनही वनपट्टे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे नागरिक कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत.
राजोलीत अर्धवट पुलावरून प्रवास
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.
कुरखेडा येथे पार्किंगची व्यवस्था करा
कुरखेडा : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.
कोरची विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. या विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. या ठिकाणी विश्रामगृह बांधल्यास अधिकाऱ्यांसाठी सोयीचे हाेईल.