शिविगाळप्रकरणी आरएफओवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:20 AM2017-07-19T01:20:08+5:302017-07-19T01:20:08+5:30
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.एन. शेंडे यांनी विशेष सेवा वनपाल के.एफ. दुर्गे यांना
पालकमंत्र्यांना निवेदन : आसरअल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची चौकशी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.एन. शेंडे यांनी विशेष सेवा वनपाल के.एफ. दुर्गे यांना अश्लिल भाषेत शिविगाळ केली. त्यामुळे संबंधित वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना नागपूरच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांना दिले आहे. वनपाल दुर्गे यांनी बँक कर्जाच्या शिफारस पत्रावर सही करण्याची विनंती केली असता, वनपरिक्षेत्राधिकारी यांनी शिफारस पत्र फाडून टाकले व फाईल फेकून दिली. त्याचबरोबर वनपाल दुर्गे यांना अश्लिल शिविगाळ करून टाचणीचा डब्बा फेकून मारला. वनपरिक्षेत्राधिकारी हे नेहमीच वनकर्मचाऱ्यांना अपमानजनक वागणूक देत आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आरएफओवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना नागपूर व जुनी पेंशन हक्क संघटना महाराष्ट्र राज्यच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.