आदिवासींच्या नावावर नोकरी मिळविणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:35 AM2017-07-22T00:35:31+5:302017-07-22T00:35:31+5:30
बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींच्या नावावर नोकऱ्या बळकावणाऱ्या बोगस आदिवासींना तत्काळ नोकरीतून काढून
एम्प्लॉईज फेडरेशनची मागणी : आदिवासी विकासमंत्र्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींच्या नावावर नोकऱ्या बळकावणाऱ्या बोगस आदिवासींना तत्काळ नोकरीतून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी फेडरेशनच्या वतीने आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा व पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शासकीय, निमशासकीय संस्था, बँका व विविध क्षेत्रात बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर अनेकांनी नोकरी बळकाविली आहे. त्यांना सेवेतून काढून टाकावे, तसेच अनुसूचित जमातीच्या नावावर पदवी मिळविलेल्यांची पदवी रद्द करावी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालयात तसेच अन्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश देताना वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीवर हमीपत्राद्वारे देण्यात येणारे प्रवेश रद्द करण्यात यावे, तसेच हमीपत्राची अट रद्द करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्राशिवाय हमीपत्रावर उमेदवारी पात्र ठरवू नये, नवोदय विद्यालयाच्या प्रवेशाकरिता अनुसूचित जमातीसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक करण्यात यावे, यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश होता. बोगस आदिवासी खऱ्या आदिवासींच्या नावावर नोकऱ्या बळकवित असल्याने खऱ्या आदिवासींना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. सर्वाेच्च न्यायालयाने ६ जुलैला दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना भरत येरमे, माधवराव गावळ, आनंद कंगाले, सुनीता मरस्कोल्हे, सुरेश पेंदाम, फरेंद्र कुत्तीरकर, नानाजी आत्राम, हेमराज मसराम, बंडू तिलगामे, अरमसिंह गेडाम, वनिश्याम येरमे, राजेश्वर पदा, संदीप वरखेडे, अरविंद गेडाम, लक्ष्मण कोवे, कैलास मडावी, विनायक कोवे, हिरामण उईके, आविपचे घनश्याम मडावी, केशव तिरणकर, क्रांती केरामी, दौलत धुर्वे हजर होते.