पॅरावैद्यक परिषदचे प्रमाणपत्र नसणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:47 AM2021-06-16T04:47:57+5:302021-06-16T04:47:57+5:30
प्रबंधक, महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद मुंबई यांनी १० मे २०२१ला अनधिकृत क्लिनिकल लॅबोरॅटरी व पॅरा वैद्यक व्यावसायिक यांच्याकडे महाराष्ट्र ...
प्रबंधक, महाराष्ट्र पॅरा वैद्यक परिषद मुंबई यांनी १० मे २०२१ला अनधिकृत क्लिनिकल लॅबोरॅटरी व पॅरा वैद्यक व्यावसायिक यांच्याकडे महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद अधिनियम २०११ च्या रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नसणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १७ मे २०२१ ला जिल्ह्यातील संपूर्ण तहसीलदारांना कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
या पत्रान्वये गडचिरोली जिल्ह्यातील तहसीलदारांनी अनधिकृत प्रयोगशाळा व क्लिनिकल लॅबोरॅटरी यांच्यावर कारवाई संदर्भात मोहीम उघडली असून, समिती स्थापन करण्याचे आदेशित केले आहे. यात चामोर्शी तालुक्यातील सहा अनधिकृत क्लिनिकल लॅबोरॅटरीज मागील १० दिवसांपासून बंद केल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र पॅरावैद्यक अधिनियम २०११ अंतर्गत २२ नोव्हेंबर २०१८ पासुन रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदने सुरू केली आहे. तीन वर्षांचा कालावधी उलटूनही चामोर्शी येथील क्लिनिकल लॅबोरॅटरीधारकांकडे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नाही, असे केंद्रीय एमएलटीएएम संघटनेने म्हटले आहे. विना रजिस्ट्रेशन लॅबोरॅटरी चालविणे कायद्याच्या विरुद्ध आहे, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप झाडे व सचिव दीपक चंदनखेडे यांनी म्हटले आहे.