दारू विक्रेत्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:15 AM2018-04-22T01:15:01+5:302018-04-22T01:15:01+5:30
तळेगाव, मोहगाव व साधुटोला येथील दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा. या मागणीसाठी कुरखेडा तालुक्यातील तळेगाव व वाकडी गावातील अनेक महिला शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तळेगाव, मोहगाव व साधुटोला येथील दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा. या मागणीसाठी कुरखेडा तालुक्यातील तळेगाव व वाकडी गावातील अनेक महिला शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या महिलांच्या तक्रारी ऐकल्या व निवेदन स्वीकारले. दारू बंद करण्यासाठी आपला पाठींबा असल्याचे सांगून दारू विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले. गावातील संघटनेला दारू बंद करण्यासाठी इतर काय प्रयत्न करता येतील याविषयीही त्यांनी महिलांशी चर्चा केली.
स्थानिक पोलिसांचे फारसे सहकार्य मिळत नाही. दारू विक्रेत्यांना लगेच सोडले जाते, दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जात नाही. त्यामुळे दारू विक्रेते मुजोर होत आहेत, अशा तक्रारी घेऊन महिला पोलीस अधीक्षकांना निवेदन द्यायला आल्या होत्या. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांना निवेदन द्यायला आलेल्या महिलांपैकी कोणाचा नवरा दररोज घरातले तेल तांदूळ विकून दारू पितो, तर कुणाचा मुलगा दारू पिऊन शिवीगाळ करतो, एखादा नवरा दारू पिऊन आपल्या पोटच्या मुलींना मारण्याची धमकी देतो, तर कोणाचा भाऊ दारू पिऊन घरी त्रास देतो, अशा एक ना अनेक कहाण्या या महिलांपैकी प्रत्येकीच्या होत्या. यावरच उपाय म्हणून गावाची दारू बंद करण्यासाठी या महिलांनी गावात दारू विक्री बंदी केली, पण आसपासच्या गावात मात्र मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरूच आहे. यावर कारवाई होत नसल्याने दारूमुळे होणारे त्रास काही कमी होत नाहीत, असे महिलांनी एसपींना सांगत होत्या.
यावेळी तळेगाव व वाकडी येथील अरुणा काशिनाथ गोनाडे, वनिता सहारे, वंदना काशिनाथ गोनाडे, वैशाली नैताम व दारूमुक्ती समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.