योजनांच्या लाभातून उन्नती साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:03 AM2018-12-23T00:03:00+5:302018-12-23T00:04:07+5:30
शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी उन्नती साधावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी उन्नती साधावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी केले.
तालुक्यातील पोटेगाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने गव्हाळहेटी येथे गुरूवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटन पं. स. सदस्य मालता मडावी यांच्या हस्ते झाले. यावेळी नायब तहसीलदार हेमंत मोहरे, रेगडीचे पीएसआय एस. पी. उपरे, पोटेगावचे पीएसआय श्रीकांत डांगे, पीएसआय शिवराज कदम, शिवाजी नरोटे उपस्थित होते. जनजागरण मेळाव्यात पशुवैैद्यकीय विभाग, महसूल, कृषी, आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारचे स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान सिकलसेल तपासणी शिबिर घेण्यात आले. कृषी विभागामार्फत तीन शेतकऱ्यांना मिनी किटचे वाटप करण्यात आले. तसेच पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील ३० गरजू लाभार्थ्यांना थंडीपासून बचावासाठी मफलर व स्वेटरचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीएसआय श्रीकांत डांगे, संचालन पोलीस हवालदार उदयभान जांभुळकर तर आभार पीएसआय शिवराज कदम यांनी मानले. जनजागरण मेळाव्याला पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी तसेच ४०० च्या आसपास नागरिक उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस
पोलीस मदत केंद्राच्या वतीने १८ व १९ डिसेंबरदरम्यान पोटेगाव येथे घेतलेल्या बिरसा मुंडा व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक देवदा, द्वितीय रामनगर, तृतीय क्रमांक चितेकन्हारच्या संघाने पटकाविला. विजेत्या संघाला अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार रूपयांचे पारितोषिक तसेच सहभागी संघाला प्रोत्साहन प्रमाणपत्र व क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.