शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:01 PM2018-02-19T23:01:12+5:302018-02-19T23:01:37+5:30
राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख हे १६ फेब्रुवारीला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली.
आॅनलाईन लोकमत
आरमोरी : राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख हे १६ फेब्रुवारीला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. शेतमाल तारण योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, आ. कृष्णा गजबे, ना. देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, जिल्हा नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खिरसागर नाकाडे, उपसभापती ईश्वर कासेवार, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, सहायक निबंधक मोरेश्वर गणवीर, सचिव अमिष निमजे यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी ना. सुभाष देशमुख यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या योजनांचा आढावा घेतला. शेतमाल तारण योजनेच्या गोदामाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाची नुकसान होणार नाही, याची काळजी बाजार समितीने घेतली पाहिजे, कर्जपुरवठ्याची आवश्यकता असल्यास आम्ही मदत करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तारण योजना राबविण्यात आरमोरी बाजार समितीचा महाराष्ट्रातून चवथा क्रमांक लागतो, असे सांगत त्यांनी बाजार समितीच्या कार्याचे कौतुक केले. सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी सन १९९५-९६ पासून शेतमाल तारण योजना स्वनिधीतून राबवित असल्याचे ना. देशमुख यांनी सांगितले. शेतमाल तारण योजनेस निधी कमी पडू देणार नाही व समितीच्या कार्याक्षेत्रातील प्रत्येक गावात तारण योजना पोहोचवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे संचालक मुखरू वाघाडे यांनी केले तर संचालन समितीचे सचिव अमिष निमजे यांनी केले. त्यांनी बाजार समितीच्या योजनांची माहिती मंत्रीमहोदयांना सविस्तरपणे दिली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.