विधी चिकित्सालयाचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:31 PM2017-11-18T23:31:40+5:302017-11-18T23:32:06+5:30
कायद्याची अर्धवट व चुकीची माहिती तसेच छोट्या वादाकरिता न्यायालयीन प्रक्रियेत नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायचे,....
आॅनलाईन लोकमत
कुरखेडा : कायद्याची अर्धवट व चुकीची माहिती तसेच छोट्या वादाकरिता न्यायालयीन प्रक्रियेत नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायचे, ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयीन प्रक्रिया सोपी करीत न्याय लोकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याकरिता व त्यांना मानसिक ताणतणावातून मुक्ती देण्याकरिता मार्गदर्शन केंद्र म्हणून तालुका व ग्रामपंचायत स्तरावर विधी सहायक चिकित्सालय सुरू करण्यात येत आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी केले.
गेवर्धा येथे कुरखेडा तालुका विधी सेवा समितीच्या वतीने शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयात विधी सहाय्य चिकित्सालय केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन न्यायाधीश मेहरे यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाला कुरखेडाचे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम.आर. बागडे, उपविभागीय पोलीस अधिकारी काळे, सरपंच टिकाराम कोरेटी, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बुद्धे, सहायक सरकारी अधिवक्ता अॅड. नाकाडे, नायब तहसीलदार मडावी, सहायक गटविकास अधिकारी मेश्राम, अॅड. उमेश वालदे, अॅड. रूपाली माकडे, अॅड. नागमोती, उपसरपंच संदीप नखाते, ग्रामविकास अधिकारी विशाखा राऊत, सदस्य रोशन सय्यद, पंढरी नाकाडे, व्यंकटी नागीलवार, अशरफ अली सय्यद उपस्थित होते.
पुढे बोलताना न्यायाधीश मेहरे म्हणाले, आजच्या महिला कार्यक्षम असून त्या सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. याप्रसंगी स्थानिक महिला अॅड. रूपाली माकडे, ग्रामसचिव विशाखा राऊत व उत्तम अभिनय सादर करणाºया बालिकेला मंचावर पाचारण करून प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अॅड. छन्ना जनबंधू तर आभार अॅड. ए.पी. नाकाडे यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम
तालुका विधी सेवा समिती देसाईगंजच्या वतीने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम शनिवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मेहरे होते कार्यक्रमात मध्यस्थी केंद्राची भूमिका, न्यायालयीन प्रक्रियेत मध्यस्थी केंद्राचे महत्त्व याबाबत न्यायाधीश संजय मेहरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. संजय गुरू, संचालन अॅड. ए.पी. नाकाडे तर आभार दिवाणी व फौजदारी न्यायाधीश के.आर. सिंघेल यांनी मानले. यावेळी अॅड. ढोरे, अॅड. मंगेश शेंडे, अॅड. मडावी, अॅड. चोपकर, अॅड. बुद्धे, अॅड. खोब्रागडे, अॅड. पिल्लारे, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे व पक्षकार उपस्थित होते.