योजनांचा लाभ घेऊन विकास साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:35 AM2017-09-28T00:35:55+5:302017-09-28T00:36:58+5:30
शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती घेऊन नागरिकांनी लाभ घ्यावा व आपला व कुटुंबाचा विकास साधावा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बामणी : शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती घेऊन नागरिकांनी लाभ घ्यावा व आपला व कुटुंबाचा विकास साधावा, असे आवाहन बामणी उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहूल वाघमारे यांनी मंगळवारी केले.
कंबलपेठा येथे पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित जनजागरण मेळाव्यात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन तलाठी अश्विन तलांडी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य मुतया नरवेदी, एस. व्ही. कुमरे, शकील शेख, यशवंत तिम्मा, भुते तसेच उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील, तंमुस अध्यक्ष उपस्थित होते.
याप्रसंगी नागरिकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. तसेच विविध विभागाच्या वतीने स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन विष्णू कोल्हे, प्रास्ताविक संदीप बागडे तर आभार शिवप्रसाद करमे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचारी व नागरिकांनी सहकार्य केले.