आया-बाया कंबर कसून उठा गं, दारू विकेल त्याला धरून कुटा गं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:58 PM2019-01-03T23:58:09+5:302019-01-03T23:58:33+5:30
मुस्का येथे दारू व खर्राबंदी अंमलबजावणीची सभा घेण्यात आली. तत्पूर्वी काढलेल्या रॅलीतील घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. व्यसनामुळे शरीर व मन दुबळे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : मुस्का येथे दारू व खर्राबंदी अंमलबजावणीची सभा घेण्यात आली. तत्पूर्वी काढलेल्या रॅलीतील घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. व्यसनामुळे शरीर व मन दुबळे होते. व्यसनमुक्तीची सुरूवात स्वत:पासून करण्यासाठी सर्वप्रथम स्वत:चे कार्यालय तंबाखुमुक्त केले. आता तालुक्याच्या तंबाखुमुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी यावेळी सांगितले.
या सभेला ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक जाधव यांनी मार्गदर्शन करताना महिला कार्यकर्त्यांना धमकी व शिविगाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुरूमगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम यांनी तंबाखु व दारूचे आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य सेवक कलुरी यांनी केले. यावेळी रॅली काढण्यात आली. ‘आया बायांनो कंबर कसून उठा गं, जो दारू विकेल त्याला धरून कुटा गं’ अशा घोषणा देत गावातून रॅली काढली. या रॅलीत महाराष्ट्र विद्यालय, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुस्काचे विद्यार्थी सहभागी झाले होते. दारू तसेच खर्रा विक्रेत्यांच्या घरी जाऊन महिलांनी खर्रा व दारू बंद करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मुक्तीपथ संघटनेचे संघटक सागर गोतपाघर यांनी खर्रा व दारूबंदी कागदावर न राहता प्रत्यक्षात आणण्यासाठी महिलांनी सतत कृतीशील राहण्याचे आवाहन केले. प्रेरक भास्कर कड्यामी यांनी व्यसनमुक्ती गाण्यातून प्रबोधन केले. यावेळी पं.स. सदस्य विलास गावडे, रामदास बोरकर, रसिका मारगाये, निलीमा ठलाल, गीता चोपडे, सावित्रा बोंगा, प्रकाश देसाई आदी उपस्थित होते. सभेला गावातील शेकडो महिला, युवक व पुरूष उपस्थित होते.