कुत्र्यांचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:25+5:302021-07-10T04:25:25+5:30
एटापल्ली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, ...
एटापल्ली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
मार्ग खड्ड्यांत
गडचिरोली : तालुक्यातील आंबेशिवणी ते अमिर्झा मार्गाची ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवाशासह वाहनधारकांनी केली आहे.
मधसंकलन प्रशिक्षणाची मागणी
धानोरा : जिल्ह्यात मधसंकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मधसंकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध मिळण्यास होण्यास मदत होईल. त्यामुळे मधसंकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे.
देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्ग उखडला
आरमाेरी : देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे लावा
गडचिरोली : खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र यासाठी अनुदानाची तजवीज शासनाने करून दिली नसल्याने अजूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकाही शाळेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत. त्यामुळे धाेका आहे.
वसातील निवारा जीर्ण
गडचिरोली : तालुक्यातील आरमोरी मार्गावरील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका आहे.
बायोगॅस अनुदान वाढवा
गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात आजही बऱ्या प्रमाणात गोधन आहे. गोधनापासून मिळणाऱ्या शेणाचा उपयोग हाेऊ शकताे.
शेतीचा नमुना क्र. आठ द्या
वैरागड : वनहक्क कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना अतिक्रमित जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. मात्र सदर पट्टे मिळालेले शेकडो शेतकरी सातबारा उताऱ्यापासून वंचित आहेत. सातबारा मिळालेले शेतकरीसुद्धा नमुना आठपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत.
केरोसिनअभावी अडचण
अहेरी : ज्या नागरिकांनी गॅसजोडणी घेतली आहे, अशा नागरिकांना केरोसिनचा पुरवठा करणे शासनाने बंद केले आहे. पावसाळ्यात विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसिन मिळत नसल्याने अडचण वाढली आहे. ग्रामीण भागात विद्युतपुरवठा वारंवार खंडित होतो.
राजोलीचा पूल अर्धवट
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला आहे. पाच वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम झाले होते. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापावे लागते.