आष्टी परिसरातील बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:43 AM2021-09-14T04:43:34+5:302021-09-14T04:43:34+5:30
आष्टी : गडचिरोली जिल्ह्यात चपराळा व भामरागड हे दोन अभयारण्य आहे. दोन वर्षांपूर्वी चपराळा अभयारण्यातील विविध कक्षांमध्ये पाच ...
आष्टी : गडचिरोली जिल्ह्यात चपराळा व भामरागड हे दोन अभयारण्य आहे. दोन वर्षांपूर्वी चपराळा अभयारण्यातील विविध कक्षांमध्ये पाच ते सहा बिबट सोडण्यात आले, असा अंदाज या भागातील नागरिकांचा आहे. आता यातील बिबट कोंबड्या व बकऱ्या फस्त करण्याची माेहीम सुरू केले आहे. रविवारला चक्क बिबट्याने एका मुलावर हल्ला केला. परिणामी या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्यांचा वेळीच बंदाेबस्त करण्याची गरज आहे. अन्यथा कित्येक नागरिकांचा नाहक बळी जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने वेळीच बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यालगत असलेल्या जंगलात विविध गावात व परिसरात वाघ दाखल झाले आहे. त्यामुळे दहशत पसरली आहे. चपराळा अभयारण्यात दोन वर्षांपूर्वी विविध कक्षांमध्ये जवळपास सहा बिबट असल्याचे दिसून येत आहे.
मागील अनेक दिवसांपासून बिबट आष्टी परिसरात काेंबड्या व बकऱ्यावर ताव मारीत आहे. बिबट्याने पेपर मिल परिसरातील झुडुपांमध्ये आपले बस्थान मांडले आहे. इल्लूर गावातील काेंबड्या व बकऱ्या काही दिवसांपूर्वी बिबट्याने फस्त केले. तसेच गावातील नागरिकांना बिबट्याचे दर्शनही घडले हाेते. १५ दिवसांपूर्वी मुलचेरा तालुक्यातील येल्ला येथील एका इसमाला बिबट्याने ठार केले हाेते. तेव्हापासून नागरिक शेतात एकटे जाऊन काम करण्याची हिंमत दाखवत नाही. आता बिबट्याने आष्टी परिसरात आपला माेर्चा वळविल्याने बंदाेबस्त करणे गरजेचे आहे.
कोट....
आजपर्यंत बिबट्याने अनेक शेळ्या व कोंबड्या ठार केल्या. रविवारी बिबट्याने पेपर मिल मध्ये एका आठ वर्षाच्या मुलावर हल्ला केला. यात त्याच्या हाताला व कंबरेला गंभीर जखम झाली. मात्र मोठी दुर्घटना टळली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची विचारपूस केली. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.
- बी.बी. राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, मार्कंडा (कं)