चामोर्शीतील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:49 AM2021-02-27T04:49:28+5:302021-02-27T04:49:28+5:30

आरमोरी तालुक्यातील गावांना लाइनमनच नाही आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत राइसमिल, आटा चक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना ...

Take care of Mokat pigs in Chamorshi | चामोर्शीतील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा

चामोर्शीतील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा

Next

आरमोरी तालुक्यातील गावांना लाइनमनच नाही

आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत राइसमिल, आटा चक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो; परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.

भामरागड तालुक्यातील पर्यटनस्थळ दुर्लक्षित

भामरागड : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. भामरागड तालुक्यातील बिनागुंडासह अन्य पर्यटन स्थळांचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे या स्थळांचा विकास करण्याची गरज आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्याच्या बाजूची झाडे ठरताहेत धोकादायक

गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहने दिसत नाही. यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडपे तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चामोर्शी व आरमोरी मार्गावर काटेरी झुडपे वाढली आहेत.

जिल्ह्यात रोजगाराभिमुख तंत्रशिक्षणाचा बट्ट्याबोळ

आरमोरी : कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर तंत्रशिक्षण संस्था निर्माण केल्या असल्या तरी यातील अभ्यासक्रम पूर्णपणे कालबाह्य झाले आहेत. त्याचबरोबर यातील अनेक पदे रिक्त आहेत.

स्नेहनगरात जंतुनाशक फवारणी करा

गडचिरोली : स्थानिक स्नेहनगरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. पालिका व आरोग्य प्रशासनाने नाल्यांमध्ये जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

शेकडो नागरिक अस्थमा आजाराने ग्रस्त

गडचिरोली : प्रदूषण, धुळीचे कण, धूम्रपान व अनुवांशिक कारणांमुळे उद्भवणारा अस्थमा आजार जीवघेणा ठरू शकतो. मागील एका वर्षात सहा रुग्णांना या आजारामुळे प्राणास मुकावे लागले होते. दिवसेंदिवस अस्थमा रोगाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे.

रायगट्टा पुलावर कठडे लावण्याकडे दुर्लक्ष

अहेरी : तालुक्यातील रायगट्टानजीक पुलावर कठडे नसल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पुलावरून पावसाळ्यात नेहमीच पाणी असते. परिणामी अनेकदा वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पुलावर कठडे लावण्याची आवश्यकता आहे.

जिल्हा परिषदेत दिव्यांगांची ससेहोलपट

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, असा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी मांडण्यात आला. मात्र, सदर प्रस्तावावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्ट बसविण्यात आली नाही. त्यामुळे वृद्ध व अपंग नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

विमा नसलेल्या वाहनांवर कारवाईच नाही

भामरागड : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर शेकडो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. प्रशासन कारवाईबाबत सुस्त आहे.

कंटेनरभोेवतालचा कचरा उचला

गडचिरोली : घरून गोळा केलेला कचरा घंटागाडी चालक जवळपासच्या कचरा कंटेनरमध्ये नेऊन टाकतात. मात्र, टाकतेवेळी पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने अर्धा कचरा खाली पडतो. सदर कचरा वादळामुळे नागरिकांच्या दारापर्यंत उडत जातो. या कचऱ्यावर दिवसभर डुकरांचा हैदोस राहतो. कंटेनरमध्ये कचरा व्यवस्थित टाकण्याची मागणी आहे.

विद्युत तारांवरील फांद्यांची कटाई करा

अहेरी : रस्त्याच्या बाजूने विजेचे खांब आहेत. रस्त्याच्या बाजूला झाडे सुद्धा आहेत. झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर आल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा धोका असतो. त्याचबरोेबर एखादी दुर्घटनासुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्युत तारांवरील फांद्या तोडण्याची मागणी आहे.

टाकीत साचतेय अशुद्ध पाणी

गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शहरात पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे; परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.

उघड्यावरील खाद्यपदार्थांकडे दुर्लक्ष

गडचिरोली : अनेक तालुका मुख्यालयाच्या हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

वयोवृद्धांना तीन हजार रुपये पेन्शन द्या

आलापल्ली : जिल्ह्यात वयोवृद्ध ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रतिमहिना तीन हजार रुपये वृद्धापकालीन अर्थसाहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

चतुर्थ श्रेणी दर्जापासून कोतवाल वंचित

आष्टी : गावात दवंडी देणे, जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे, शेतसारा जमा करणे, अशी विविध कामे करणाऱ्या जिल्हाभरातील सजाअंतर्गत कोतवालांना महिन्याकाठी अल्प मानधन दिले जात आहे. वारंवार मागणी करूनही कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.

शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा पुरवा

देसाईगंज : ऑनलाइन सातबारा शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी होत आहे. हस्तलिखित सातबारे बंद केल्याने शेतकऱ्यांना सेतू केंद्राचे हेलपाटे मारावे लागत आहेत. यात त्यांची आर्थिक लूट केली जात आहे.

रेगडी - कसनसूर मार्गाची ठिकठिकाणी दुर्दशा

घोट : रेगडी - कसनसूर मार्गाची दुर्दशा झाली असून, या मार्गावरील पुलानजीक मोठे खड्डे पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र, रस्ता व पुलावरील खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर किरकाेळ अपघात वाढले आहेत. भविष्यात गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

धानोरा : कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाच्या वेळेवर येणे गरजेचे असतानाही बहुतांश कर्मचारी ११ वाजल्याशिवाय येतच नाहीत. त्यामुळे कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक येऊन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत असतात. तालुक्याच्या अतिदुर्गम व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना कामाशिवाय परतावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंडसुद्धा साेसावा लागताे.

Web Title: Take care of Mokat pigs in Chamorshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.