व्यक्तींचे १४ बळी घेणाऱ्या वाघांचा बंदाेबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:45 AM2021-09-16T04:45:53+5:302021-09-16T04:45:53+5:30
गडचिराेली : गडचिराेली तालुक्यात अनेक वाघ असून, ते धुमाकूळ घालत आहेत. नरभक्षक वाघामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ...
गडचिराेली : गडचिराेली तालुक्यात अनेक वाघ असून, ते धुमाकूळ घालत आहेत. नरभक्षक वाघामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. निष्पाप नागरिकांचे आतापर्यंत १४ बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदाेबस्त करण्यासाठी वन विभागाला आवश्यक ते निर्देश द्यावे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियाेजन समितीचे सदस्य अरविंद कात्रटवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
कात्रटवार यांनी मुंबई गाठून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना वाघाच्या दहशतीमुळे गडचिराेली तालुक्यात निर्माण झालेल्या समस्येची माहिती दिली. वाघाचा बंदाेबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिराेली जिल्ह्यात प्रामुख्याने धान हे प्रमुख पीक आहे. शेती व्यवसाय हाच उत्पन्नाचे साधन आहे. शेतकऱ्यांना विविध कामासाठी शेतावर जावे लागते. गडचिराेली तालुक्यातील अनेक गावांना लागून झुडपी जंगल आहे. या जंगलात नरभक्षक वाघाचा संचार असून, वाघ शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत आहे. तालुक्यात महिनाभरात आतापर्यंत वाघाने १४ बळी घेतले आहेत. त्यामुळे दखल घ्यावी, असे म्हटले आहे.