‘घेऊन जा..गे... मारबत...’ ची हाकाटी होतेय लुप्त..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:44 AM2021-09-07T04:44:09+5:302021-09-07T04:44:09+5:30
वैरागड : गावखेडे शहरातून येणाऱ्या मोठ्या डांबरी, सिमेंट रस्त्याने जोडली गेली आणि शहराच्या प्रभावात अस्सल ग्रामीण बाज, संस्कृतीचा प्रभाव ...
वैरागड : गावखेडे शहरातून येणाऱ्या मोठ्या डांबरी, सिमेंट रस्त्याने जोडली गेली आणि शहराच्या प्रभावात अस्सल ग्रामीण बाज, संस्कृतीचा प्रभाव कमी झाला आहे. ग्रामीण भागात पोळ्याच्या पाडव्याला पहाटेला ‘ईडा, पिडा, ढेकून, मोगसा (मच्छर) घेऊन जा.. गे... मारबत....!’ अशी मोठ्याने हाकाटी देण्याची पद्धत होती. सर्व वाईट गोष्टी गावातून नष्ट होऊ दे आणि गावात सुख, शांती लाभू दे, असा त्या हाकाटीमागील अर्थ होता. अलीकडे ती हाकाटी आणि मारबतही हरवल्याचे दिसून येते.
धरणीमातेच्या कुशीत हिरवे सपान फुलवणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यासाठी पोळा सण म्हणजे आनंदाची पर्वणीच. पहिल्या दिवशी वाटबैल, दुसऱ्या दिवशी बैलपोळा आणि तिसऱ्या दिवशी तान्हा पोळा असे तीन दिवस हा सण साजरा व्हायचा. खरिपाचा हंगाम झाला की, बारा महिने पाठीवर असूड घेऊन काळ्या आईची सेवा करणाऱ्या सर्जा-राजाच्या जोडीचा विश्रांतीचा काळ येतो; पण आता बैलांची संख्याही कमी झाली आहे. शहरी भागात तर पूजनासाठी सजवलेली बैलजोडी मिळणेही कठीण झाले आहे.
ग्रामीण भागात बळीराजा आजही पोळ्याच्या दिवशी मनोभावे आपल्या बैलजोडीचे पूजन करून पुरणाच्या पोळीचा नैवेद्य देऊन त्याच्याबद्दल ऋण, प्रेम व्यक्त करत असतो. बैलपोळा म्हणजे पिठोरी अमावास्येचा दिवस. या दिवशी श्रावण मासाची समाप्ती होते. बैल पूजनासाठी हा दिवस शुभ मानला जातो. पोळ्याच्या पाडव्याचा उत्साहसुद्धा अलीकडे ओसरल्याचे जाणवते. पाडवा म्हणजे खाण्यापिण्यापुरता विषय राहिला आहे. पूर्वी ग्रामदेवीला स्मरण करून गाव सुखी, संपन्न व्हावे म्हणून प्रत्येक घरातून पोळ्याच्या पाडव्याला पहाटेच मारबती निघायच्या. ईडा, पिडा, ढेकून, मोगसा घेऊन जा गे.. मारबत...! अशा हाकाट्या देत मारबतीला गावातून फिरविले जायचे; पण हे चित्र आता लोप पावत आहे.
(बॉक्स)
मारबत प्रथा आणि पुतणा मावशीचा वध
मारबत प्रथेला संदर्भ असा दिला जातो की, द्वापार युगात गोकुळात बाळकृष्णाचा वध करण्यासाठी पुतणा राक्षशिणीने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण करून गोकुळात प्रवेश केला आणि स्तनपानातून कृष्णाला विष पाजण्याचा प्रयत्न केला. बाळकृष्णाने पुतणाचा कपटी डाव ओळखला आणि तो डाव तिच्यावरच उलटवला आणि तिचा वध केला. तिचा अगडबंब देह नंदाच्या गोकुळात धारातीर्थी पडला. दुसऱ्या दिवशी पहाटेला गोकुळवासीयांनी तिचा देह गावाच्या वेशीवर नेऊन पुरला आणि अनिष्ट वृत्तीचा नाश केला. त्याचेच प्रतीक म्हणून पोळ्याच्या पाडव्याला मारबत काढण्याची प्रथा असल्याचे सांगितले जाते. आजही गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात ही प्रथा अनेक गावांत कायम आहे.