खाणीची सुनावणी कोरचीत घ्या
By admin | Published: July 11, 2017 12:39 AM2017-07-11T00:39:07+5:302017-07-11T00:39:07+5:30
तालुक्यातील झेंडेपार लोह प्रकल्पाची सुनावणी ३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
५०० पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती : झेंडेपार प्रकल्पाबाबत तहसीलदारांर्शी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील झेंडेपार लोह प्रकल्पाची सुनावणी ३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली आहे. सुनावणीसाठी गडचिरोली येथे जाणे प्रत्येकच नागरिकाला शक्य नाही. त्यामुळे या प्रकल्पाची सुनावणी कोरची येथे घेण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी तहसीलदारांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे मोठ्या प्रमाणात लोहखनिज आहे. या लोहखनिजाचे खणन करण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे. खाण सुरू करण्यापूर्वी या परिसरातील नागरिकांचे मत जाणून घेण्याच्या उद्देशाने ३ आॅगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. सुनावणीबाबत नागरिकांशी चर्चा करण्यासाठी राजीव भवन कोरची येथे ९ जुलै रोजी सभा आयोजित केली होती. या सभेला झेंडेपार, भर्रीटोला, नांदळी, मसेली आणि बफ्फरझोनमध्ये येणाऱ्या जवळपासच्या ३० गावचे ५०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.
खाणीमुळे या परिसरातील जनजीवनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सदर सुनावणीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची इच्छा वर्तविली आहे. सर्वच नागरिकांना गडचिरोली येथे ये-जा करण्याचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे सुनावणी कोरची येथेच ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी तहसीलदारांकडे व्यक्त केली.
या सुनावणीला लोहप्रकल्प कृती समितीची उपाध्यक्ष नंदकिशोर वैरागडे, पंचायत समिती सभापती तथा कृती समितीचे सचिव कचरीबाई काटेंगे, नांदळीच्या सरपंच बबीता नैताम, कोरचीचे नगराध्यक्ष नसरूभाई भामानी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज अग्रवाल, भाजपा तालुकाध्यक्ष आनंद चौबे, नगरसेवक हिरामन राऊत, नांदळीचे उपसरपंच, श्यामलाल मडावी, झाडूराम हलामी, इजामशाही काटेंगे, जुमेनसिंग होळी, गुलाबसिंग कोडाप, पं. स. उपसभापती श्रावण मातलाम, सुखदेव नैताम, कोरची तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सियाराम हलामी, धनीराम हिळामी आदी उपस्थित होते. चर्चेनंतर मागणीचे निवेदन तहसीलदार पुष्पलता कुमरे यांना दिले.