बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:23 PM2019-05-27T22:23:35+5:302019-05-27T22:23:48+5:30
फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.
परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. सीलबंद वेस्टनातील लेबल असलेले बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पक्की पावती (बिल) घ्यावी. बिलावर पीक, वाण, प्लॉट नंबर, वजन, बियाणे ज्या कंपनीचे आहे त्या कंपनीचे नाव, बियाण्यांची किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, विक्रेत्यांचे नाव, सही, रोख किंवा उधार आदींचा उल्लेख असावा. बियाणे खरेदी करताना वैध मुदतीची खात्री करूनच बियाणे घ्यावे. वैध मुदतीच्या आतीलच बियाणे खरेदी करावे. पिशवीवर नमूद एमआरपीपेक्षा जास्त दराने बियाणे खरेदी करू नये, बियाणे खरेदीची पावती, वेस्टन व त्यावरील लेबल (टॅग) इत्यादी जपून ठेवावे. बियाणे खरेदी करताना संबंधित विक्रेता संपूर्ण विवरणाचे बिल देत नसेल तर किंवा मुदतबाह्य बियाण्यांची विक्री करीत असेल तर तसेच छापील किमतीपेक्षा अधिक बियाणे विक्री करीत असेल तर यासंबंधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी.
पेरणीसाठी खरेदी केलेल्या बियाण्यांची पेरणीपर्यंत योग्यजागी साठवण करावी. ओलसर जागी किंवा खताजवळ बियाणे ठेवू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.