चौघांच्या खात्यातून पाच लाख ११ हजार रूपये लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:51 AM2017-10-25T00:51:20+5:302017-10-25T00:51:30+5:30
गडचिरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या चार ग्राहकांच्या खात्यातून ५ लाख ११ हजार रूपयांची रक्कम वळती करून त्यांना गंडविल्याची घटना मंगळवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या चार ग्राहकांच्या खात्यातून ५ लाख ११ हजार रूपयांची रक्कम वळती करून त्यांना गंडविल्याची घटना मंगळवारी घडली.
राजोली येथील विठ्ठल सोमाजी कुळमेथे यांच्या एसबीआयच्या बँक खात्यातून १ लाख ६० हजार रूपये, पोलीस संकूल गडचिरोली येथील सुभाष देवाजी भोयर यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार रूपये, रामपुरी वॉर्डातील प्रमोद मारोतराव पेशट्टीवार यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार रूपये व शिवाजी नगरातील जयराम भिवाजी भोयर यांच्या खात्यातून ३१ हजार रूपये अज्ञात इसमाने कोणत्याही प्रकारची माहिती न देता दुसºयाच्या खात्यात वळती केली. ज्याच्या खात्यात वळती झाली, तो इसम गुडगाव (दिल्ली) येथील आहे. याबाबतची तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय सांगळे करीत आहेत.
विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच १८ आॅक्टोबर रोजी मनोहर गंगाधर चिचघरे यांच्या बँक खात्यातून १ लाख ६० हजार रूपयांची रक्कम दुसºयाच्या खात्यात वळती करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसरी घटना घडली आहे. विशेष म्हणजे हे सर्व खातेदार स्टेट बँक आॅफ इंडियाचे असल्याने या बँकेच्या खातेदारांमध्ये खळबळ माजली आहे. बँकेने आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्यांनी केली आहे.
माहिती न विचारताच पैसे वळते
यापूर्वी एका बँक खात्यातून दुसºया बँक खात्यात पैसे वळते करण्यासाठी संबंधित खातेदाराच्या एटीएम कार्डचे पासवर्ड विचारले जात होते. पासवर्ड मिळाल्यानंतर रक्कम दुसºया खात्यात वळती केली जात होती. याबाबत नागरिकांमध्ये बºयाप्रमाणात जागृती झाली असल्याने नागरिक आपला एटीएम पासवर्ड देत नाही. आता मात्र संबंधित खातेदाराला कोणतीही विचारणा न करताच त्याच्या बँक खात्यातून पैसे वळते केले जात आहेत. पैसे वळते केल्याचा संदेश मोबाईलवर आल्यानंतर संबंधित व्यक्तीला आपले पैसे काढले गेले, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येते. नेमकी कशी फसवणूक केली जात आहे, हे शोधणे आता सायबर विभागासमोरील मोठे आवाहन आहे.
ज्यांना गंडविण्यात आले ते सर्व खातेदार एसबीआयचे आहेत. त्यामुळे एसबीआयच्या खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पैसे वळते प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती बँक अधिकाºयांनी दिली आहे.