लिफ्ट घेणे बेतले जिवावर, नियतीचा असाही दुर्दैवी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 01:01 PM2021-01-29T13:01:43+5:302021-01-29T13:03:49+5:30
Accident Gadchiroli News बस सुटल्याने एक युवकाला लिफ्ट मागून दुचाकीवर जाणे युवतीच्या जीवावर बेतले.
घनश्याम मशाखेत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बस सुटल्याने एक युवकाला लिफ्ट मागून दुचाकीवर जाणे युवतीच्या जिवावर बेतले. बुधवारी बसला ओव्हरटेक करताना धानोरा-मुरूमगाव मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअपची धडक बसून दुचाकीवरील युवक आणि युवती जखमी झाले होते. त्या युवतीचा रात्री गडचिरोली येथे रुग्णालयात मृत्यू झाला. मामिता निखिल किरंगे रा.खेडी (येरकड) असे मृत युवतीचे नाव आहे. जखमी युवकावर गडचिरोली येथे उपचार चालू आहेत.
अनेक युवक-युवती विविध प्रशिक्षण घेऊन कौशल्य प्राप्त करून स्वतःच्या पायावर उभे राहात आहेत. मामिता किरंगे ही युवती खेडी या दुर्गम भागातील असून बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ती धानोराच्या आयटीआय मध्ये ड्रेस मेकिंगचे प्रशिक्षण घेत होती. कोरोनामुळे सर्व शिक्षण प्रशिक्षण संस्था बंदच होत्या. १ जानेवारीपासून आयटीआय सुरू करण्यास परवानगी मिळाली. तेव्हापासून मामिता आपल्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मिळेल त्या साधनाने खेडीवरून धानोरा येथे प्रशिक्षणाकरिता येत होती.
घरी असल्यावर घरचे व शेतीच्या कामात आई-वडिलांना मदत करायची. प्रशिक्षण संस्थेतही हसऱ्या चेहऱ्याची, मृदू स्वभावाची मामिता सर्व मुलींमध्ये परिचित होती. हसत खेळत तिचे प्रशिक्षण सुरू होते. पण २७ जानेवारीचा दिवस तिच्यासाठी काळ ठरला. नेहमीप्रमाणे आपली कामे उरकून ती आयटीआयमध्ये प्रशिक्षणासाठी हजर झाली. ४ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे तिला घरी जाण्याचे वेध लागले होते. पण तीचा तो प्रवास जीवनातील शेवटचा प्रवास होता याची तिलाही कल्पना नव्हती.
मामिताच्या आयटीआयला ५ वाजता सुटी होते, पण कोरोनामुळे बऱ्याच बस सेवा बंद असल्याने मुरूमगाव मार्गावर सायंकाळी ४.१५ नंतर बस नाही. त्यामुळे तिने आपल्या शिक्षिकेला विनंती करून लवकर सुटी मागितली, पण काही मिनिटांच्या फरकाने तिची बस सुटली. एवढ्यात त्याच मार्गाने जाणाऱ्या एका युवकास विनंती करून तिने लिफ्ट मागितली. दुचाकीवरून वेगाने काही अंतर गेल्यास सुटलेली बस पकडता येईल असे तिला वाटले. त्यासाठी युवकाने वेगात गाडी काढली. ३ किमी अंतरावर त्यांनी बसही गाठली. बसला ओव्हरटेक करून थांबवण्यासाठी त्यांनी गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न केला, पण गावाजवळील वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही दूर फेकल्या गेले.
या आवाजाने बाजूच्या शेतात भुईमूग काढणारे मजूर मदतीला धावून गेले. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी रुग्णालयात फोन करून माहिती दिली. दोघेही जखमींना धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, परंतु गंभीर जखमी असल्याने डॉ.देवेंद्र सावसागडे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना गडचिरोली येथे रेफर केले. रात्री उपचारादरम्यान मामिताचा मृत्यू झाला. सायंकाळी या मार्गावर बस उपलब्ध असती तर माझ्या मुलीचा जीव गेला नसता अशी व्यथा तिच्या पालकांनी व्यक्त केली. तिला धडक देणारे वाहन मिळेलही परंतु लाखमोलाचा जीव परत मिळणार का? अशी हळहळ गावकरी व्यक्त करत आहेत.