एफडीसीएमला हस्तांतरणाबाबत वनमंत्र्यांशी चर्चा करणार
By admin | Published: May 20, 2016 01:15 AM2016-05-20T01:15:58+5:302016-05-20T01:15:58+5:30
गडचिरोली जिल्ह्यात एफडीसीएमला हस्तांतरीत करण्यात आलेल्या वनजमिनीच्या प्रश्नावर केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती ...
खासदारांनी घेतली बैठक : ग्रामसभांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या केल्या सूचना
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एफडीसीएमला हस्तांतरीत करण्यात आलेल्या वनजमिनीच्या प्रश्नावर केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी आढावा बैठकीत दिली. या आढावा बैठकीला भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओलालवार, जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, देवाजी तोफा, डॉ. शिवनाथ कुंभारे, एफडीसीएमचे अधिकारी, वन विभागाचे उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्राधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार अशोक नेते म्हणाले की, शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर वनजमीन एफडीसीएमला हस्तांतर केलेली आहे. या वनजमिनीवरील विविध प्रजातीच्या शेकडो मोठ्या झाडांची तोड करण्यात येत आहे मात्र हे सर्व करीत असतांना स्थानिक ग्रामसभेला विश्वासात घेतल्या जात नाही ही बाब योग्य नाही. नागरिकांनी शेकडो वर्षापासून जतन केलेल्या जंगलाची तोड करतांना गावातील नागरिकांना विचारात घेतल्या जात नाही हे काम चुकीचे असून एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन संरक्षक वनांची तोड न करता पडिक जमिनीवर नव्याने वृक्ष लागवड करून निर्सग निर्मित जंगलाचे रक्षण करण्याच्या सुचना खासदार अशोक नेते यांनी केल्या व याबाबत केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी एफडीसीएमला वनजमीन हस्तांतरणाच्या शासन निर्णयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)