रंगली चर्चा पालकमंत्र्यांची

By admin | Published: November 2, 2014 10:33 PM2014-11-02T22:33:43+5:302014-11-02T22:33:43+5:30

भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गडचिरोली या मागास जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा शहराच्या पानटपरीपासून ते गावाच्या चावडीपर्यंत रंगू लागली आहे. २००९ मध्ये

Talk to the Guardian Minister | रंगली चर्चा पालकमंत्र्यांची

रंगली चर्चा पालकमंत्र्यांची

Next

वजनदार मंत्री द्या : मागील पाच वर्ष आर. आर. पाटील यांनी सांभाळली धुरा
गडचिरोली : भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गडचिरोली या मागास जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा शहराच्या पानटपरीपासून ते गावाच्या चावडीपर्यंत रंगू लागली आहे. २००९ मध्ये ५१ पोलीस जवान शहीद झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्याकडे लादून घेतली. विधानसभेत गडचिरोलीच्या कायदा सुव्यवस्थेवर वादळी चर्चा झाल्यानंतर पाटील यांनी हा निर्णय घेतला. त्यावेळी विरोधी बाकावर असलेले सुधीर मुनगंटीवार यांचा याबाबत खास आग्रह होता. आता मुनगंटीवार हे राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले आहे. भाजपच्या सरकारात गडचिरोली या मागास जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळतो, याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या सर्व भागात रंगत आहे.
२००९ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना गडचिरोलीच्या पालकत्व पदाची जबाबदारी आर. आर. पाटील यांनी आपल्यावर लादून घेतली. गडचिरोलीच्या विकासाला चालना देण्यासाठी पाटील यांनी प्रयत्नही केलेत. परंतु या भागाचा हवा तसा विकास झाला नाही. अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहे. गडचिरोली जिल्हा हा मुंबईच्या हिशोबात अजुनही ३० ते ३५ वर्ष मागे आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीनंतर मागास भागाच्या विकासाकडे आपले लक्ष राहिल, असे जाहीर केले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासोबतच या भागात रेल्वे, हवाईपट्टी, सिंचनाचे प्रश्न, औद्योगिक विकास तसेच पायाभूत सुविधा निर्माण करणे या कामांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी तडफदार व धडाडीचा पालकमंत्री मिळणेही आवश्यक आहे.
विदर्भातील माणूस जर गडचिरोलीचा पालकमंत्री झाला तर विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास या जिल्ह्यातील जनतेला आहे. आर. आर. पाटील पालकमंत्री असताना त्यांनी जनतेपेक्षा अधिकाऱ्यांचे ऐकूण नियोजन करण्यावर भर दिला. त्यामुळे जनतेत मोठी नाराजी त्यांच्याविषयी होती. त्यांनी प्रत्येक महिन्याला गडचिरोलीला भेट देऊन आपले कर्तव्य पार पाडले. मात्र सर्वसामान्य माणसापर्यंत विकासाचे चित्र त्यांना निर्माण करता आले नाही. त्यामुळे आता नव्या सरकारच्या पालकमंत्र्यांकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहे. चांगला व अभ्यासू पालकमंत्री गडचिरोलीला लाभावा, अशी आशा जनता व्यक्त करीत आहे.
सुधीर मुनगंटीवार यांचे नावही पालकमंत्री पदासाठी सर्वसामान्यांमध्ये चर्चेत आहे. त्यांनीच त्यावेळी आर. आर. पाटील यांना आव्हान देऊन पालकमंत्री पदाची धुरा घ्यायला लावली होती. मुनगंटीवार यांनी आता स्वत: जिल्ह्याचे पालकत्व घ्यावे, असा एक विचारप्रवाह आहे. मुनगंटीवार यांच्याकडे वनखाते देण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे. वनखात्याच्या अडसरामुळे येथील अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पालकत्व घेतल्यास या जिल्ह्याला न्याय देणे शक्य होईल, असा मतप्रवाह नागरिकांमध्ये आहे. युतीचे सरकार असताना शिवसेनेचा मंत्री गडचिरोलीचा पालकमंत्री होता. या काळात गजानन किर्तीकर यांनी पालकमंत्री पद सांभाळले होते. आताही सेना-भाजपची युती होऊ घातली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला पालकमंत्री पद जाते काय? अशीही जनमाणसात चर्चा आहे. मात्र सध्या जिल्ह्यात तिनही आमदार भाजपचे तसेच खासदारही भाजपचेच आहे. त्यामुळे भाजपचा पालकमंत्री होईल, असा भाजपचा दावा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Talk to the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.