लसीकरणासाठी तालुकानिहाय सूक्ष्म कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:38 AM2021-05-21T04:38:48+5:302021-05-21T04:38:48+5:30

जे गाव लसीकरणासाठी तयार आहे त्या ठिकाणी पात्र नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. तसेच ज्या गावांमध्ये अफवा, गैरसमज ...

Taluka wise micro action plan for vaccination | लसीकरणासाठी तालुकानिहाय सूक्ष्म कृती आराखडा

लसीकरणासाठी तालुकानिहाय सूक्ष्म कृती आराखडा

Next

जे गाव लसीकरणासाठी तयार आहे त्या ठिकाणी पात्र नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. तसेच ज्या गावांमध्ये अफवा, गैरसमज आहेत त्या ठिकाणीही जनजागृती करून लसीकरण मोहिमेला गती दिली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यात लस घेण्यास तयार असलेल्या गावांच्या वयोगटानुसार याद्या तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर तालुकास्तरीय टीम गावात जाऊन लसीकरण मोहीम राबविणार आहे.

(बॉक्स)

स्थानिक पदाधिकाऱ्यांची घेणार मदत

- ग्रामीण तसेच आदिवासी भागात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी लसीकरणावेळीही जनजागृतीपर माहिती दिली जाणार आहे. लसीकरणाच्या दिवशी गावागावात स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही लसीकरणासाठी आमंत्रित केले जाणार आहे.

गैरसमज दूर करण्यासाठी लस घेणाऱ्याला कुपींची निवड स्वत: करता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या लसी असल्याबाबतचा गैरसमज दूर होईल. तसेच गावात असणारे प्रतिष्ठित व पात्र व्यक्तींना प्रथम लस देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे इतरही लोक लस घेण्यास तयार होतील.

(बॉक्स)

२१ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी

लसीकरणाला जिल्ह्यात गती देण्यासाठी आरोग्य विभागाकडून २१ प्रकारच्या उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत. या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी गावस्तरापर्यंत आरोग्य विभाग करणार आहे. यामध्ये कोरोना चाचण्यांपासून विलगीकरण व लसीकरण या बाबींचा समावेश आहे. लसीकरणात वाढ होण्यासाठी पोस्टर, कलापथक, विविध माध्यमे, महिला बचत गट सदस्य, ग्रामदक्षता समिती यांची मदत घेतली जाणार आहे.

(बॉक्स)

लसींबाबत असलेले गैरसमज आणि सत्य

१) गैरसमज - कोविड लस घेतल्यावर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो.

सत्य - ही लस मुळातच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहे. दोन्ही डोस घेतल्यावर रोगप्रतिकारक शक्ती बरेच महिने कायम राहते. लस घेऊनही कोरोना होत असल्याचे प्रमाण नगण्य आहे. कोरोना झालाच तर तो सौम्य स्वरूपाचा राहतो.

२) गैरसमज - लस घेतल्यावर मृत्यू होतो.

सत्य - लस घेतल्यानंतर मृत्यू झाला असे उदाहरण जिल्ह्यात नाही. आतापर्यंत हजारो लोकांनी लस घेतलेली आहे; पण लसीमुळे मृत्यू झालेला नाही. वास्तविक कोरोना लस घेतल्यावर संसर्ग होत नाही व त्यातून मृत्यू टाळता येतो.

३) गैरसमज - कोरोना आदिवासी भागातील लोकांना होत नाही. ती शहरातील बिमारी आहे.

सत्य - कोरोना हा संसर्गजन्य आजार असून संपर्कात आल्यास एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. लोक कामानिमित्त तालुका व इतर शहरात जात असतात. अनेक दुर्गम गाव, टोल्यावर कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

४) अफवा- कोरोना नसताना अहवाल पॉझिटिव्ह देतात. दवाखान्यात नेऊन अवयव काढून घेतात.

सत्य- ज्याला लक्षणे नाहीत अशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना गावस्तरावरच विलगीकरणात ठेवले जाते. किंवा घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येते. मात्र, लक्षणे आहेत त्यांना तातडीने दवाखान्यात उपचाराची गरज असते. कोरोना झाल्यावर अथवा मृत्यू झाल्यास कोणतेही अवयव काढले जात नाहीत. तशी व्यवस्थाच नाही.

५) गैरसमज - अहवाल पॉझिटिव्ह दिल्यास आरोग्य विभागाला, त्यांच्या कर्मचाऱ्यांना पैसे मिळतात.

सत्य - आरोग्य विभाग व त्यामधील कर्मचारी गेली कित्येक दिवस आहोरात्र सेवा देत आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यात ३ आरोग्य सेवक, १ आशा कार्यकर्ती व १ औषध निर्माण अधिकारी मृत पावला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढवल्याने कोणत्याही प्रकारचा निधी शासनाकडून मिळत नाही, ती निव्वळ अफवा आहे.

६) गैरसमज- आमच्या गावातील पुजाऱ्याकडे कोरोनावर औषध आहे.

सत्य - कोरोनावर कोणतेही खात्रीशीर औषध सध्या नाही. दवाखान्यात संसर्ग कमी करण्यासाठी औषधोपचार केले जातात. उलट गावात उपचार घेऊन संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

७) अफवा - कोरोना हे एक षडयंत्र आहे आणि लस घेतल्यावर म्हातारी लोकं मरतात, तरुणांमध्ये नपुंसकत्व/ वंध्यत्व येते.

सत्य - कोरोनात कोणतेही षडयंत्र नाही. आतापर्यंत कित्येक नेत्यांना कोरोना झाला आहे. त्यातून ते बरेही झालेत. लस घेतल्यास संसर्ग टाळता येतो. लसीमुळे नपुंसकत्व किंवा वंध्यत्व येत नाही. उलट कोरोना संसर्गाविरुद्ध प्रतिकारक क्षमता वाढते.

Web Title: Taluka wise micro action plan for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.