पाच हजारात गुंडाळले जाताहेत तेंदू लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:50 AM2018-05-05T00:50:18+5:302018-05-05T00:50:18+5:30

Tandu Auction is being rolled out in five thousand | पाच हजारात गुंडाळले जाताहेत तेंदू लिलाव

पाच हजारात गुंडाळले जाताहेत तेंदू लिलाव

Next
ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनेत चारपट कमी भाव : कंत्राटदारांकडून अत्यल्प प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तेंदूपत्ता लिलावाच्या तिसऱ्या फेरीत काही गावांचे लिलाव होत आहेत. मात्र या लिलावात केवळ ५ हजार ते ५ हजार ५०० प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव मिळत असल्याने गावकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पर्याय नसल्याने ठेकेदार बोलेल तेवढ्या किमतीला लिलाव सोडावा लागत आहे.
मागील वर्षी तेंदूपत्ता लिलावाच्या कालावधीत देशाच्या तेंदूपत्ता बाजारात प्रचंड तेजी होती. ही तेजी वर्षभर कायम राहिल. हा अंदाज बांधून तेंदूपत्ता कंत्राटदारांनी सुमारे १५ ते २२ हजार रूपये एवढा प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव देऊन तेंदूपत्ता खरेदी केला. मात्र तेंदूपत्ता संकलनाच्या तीन ते चार महिन्यानंतर तेंदूपत्त्याची मागणी व भाव दोन्ही कमी झाले. परिणामी मागील वर्षीचा काही तेंदूपत्ता अजुनही गोदामात पडून आहे. भावही घसरल्याने कंत्राटदारांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कंत्राटदारांनी पहिल्या दोन लिलावांमध्ये सहभागच घेतला नाही. तिसऱ्या फेरीच्या लिलावासाठी काही गावांमध्ये कंत्राटदारांनी बोली लावली. मात्र सदर बोली ५ हजार ते ५ हजार ५०० एवढ्या दरम्यानच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत केवळ २५ टक्के एवढाच भाव यावर्षी मिळाला आहे. मात्र नाईलाज असल्याने कंत्राटदार बोलेल तेवढ्याला लिलाव सोडावा लागत आहे. कोरची तालुक्यातील १०५ व धानोरा तालुक्यातील ८४ ग्रामसभांचे लिलाव झाले आहेत. या ग्रामसभांना ५ हजार ते ५ हजार ५०० दरम्यानचाच भाव मिळाला आहे. त्यामुळे इतर ग्रामसभांनाही यापेक्षा अधिक भाव मिळण्याची आशा धुसर झाली आहे.
बहुतांश ग्रामसभांना लिलावाची प्रतीक्षाच
कोरची व धानोरा तालुक्यातील काही ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याचे लिलाव पार पडले आहेत. त्यांना कमी का होईना उत्पन्न मिळणार आहे. मात्र १५ दिवसांवर तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम आला असताना अजूनपर्यंत एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कुरखेडा तालुक्यातील ग्रामसभांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे ग्रामसभांचे पदाधिकारी चिंतेत पडले आहेत. कंत्राटदार न मिळाल्यास लाखो रूपयांचे उत्पन्न बुडणार आहे. याचा मोठा फटका ग्रामसभांना बसणार आहे. काही ग्रामसभांचे पदाधिकारी स्वत: कंत्राटदारांशी संपर्क साधून तेंदूपत्त्याच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी निमंत्रीत करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Tandu Auction is being rolled out in five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.