तेंदूवरून ग्रामसभा व वन विभागात वाद
By admin | Published: May 27, 2017 01:15 AM2017-05-27T01:15:02+5:302017-05-27T01:15:02+5:30
चपराळा अभयारण्याअंतर्गत येत असलेल्या गावांनी तेंदूपत्ता संकलन केले. यावरून वन विभाग व गावकरी यांच्यामध्ये वाद तयार झाला.
गावकरी आक्रमक : चपराळा अभयारण्यातून तेंदू संकलनास केली होती मनाई
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : चपराळा अभयारण्याअंतर्गत येत असलेल्या गावांनी तेंदूपत्ता संकलन केले. यावरून वन विभाग व गावकरी यांच्यामध्ये वाद तयार झाला. मात्र जंगलावर आपला अधिकार आहे, तेंदूपत्ता संकलन केल्याने जंगलाची कोणतीही हानी होत नाही. ही बाब गावकऱ्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पटवून दिल्यानंतर वन विभागाचे पथक आल्यापावली परत गेले.
चपराळा अभयारण्यात चंदनखेडी, धन्नूर, चौडमपल्ली, सिंगनपल्ली, चपराळा ही गावे येतात. ही गावे आदिवासीबहुल असल्याने या गावांना पेसा कायद्याअंतर्गत तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार आहेत. मात्र वन विभागाने विरोध केला होता. वन विभागाला न जुमानता ग्रामस्थांनी तेंदू संकलन केले. ही बाब वन विभागाला माहित होताच गुरूवारी ५० कर्मचाऱ्यांचे पथक तेंदू फळीच्या ठिकाणी तेंदूपुडा जप्त करण्यासाठी पोहोचले. यामुळे नागरिकांचा राग अनावर झाला. पथकातील कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. तेंदूपत्ता संकलन कसे कायद्यान्वये आहे, ही बाब गावकऱ्यांनी पटवून दिली. त्यानंतर पथक परत गेले. उपविभागीय अधिकारी (वन्यजीव) कैलुके, आरएफओ आत्राम, मडावी, पीएसआय संदीप कराडे यावेळी उपस्थित होते.