तेंदूपत्ता व्यवसायावर मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:11 AM2018-04-02T00:11:50+5:302018-04-02T00:11:50+5:30

देशभरातील बाजारपेठेत तेंदूपत्त्याच्या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. काही व्यापाऱ्यांकडे गतवर्षी खरेदी केलेला तेंदूपत्ता अजूनही शिल्लक आहे. परिणामी कंत्राटदारांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांनी तेंदूपत्त्याच्या लिलावांकडे पाठ फिरविली आहे.

Tandupta business slowdown | तेंदूपत्ता व्यवसायावर मंदीचे सावट

तेंदूपत्ता व्यवसायावर मंदीचे सावट

googlenewsNext
ठळक मुद्देलिलावाकडे कंत्राटदारांची पाठ : अर्ध्यापेक्षा अधिक तेंदूपत्ता गोदामांमध्ये पडून

दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशभरातील बाजारपेठेत तेंदूपत्त्याच्या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. काही व्यापाऱ्यांकडे गतवर्षी खरेदी केलेला तेंदूपत्ता अजूनही शिल्लक आहे. परिणामी कंत्राटदारांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांनी तेंदूपत्त्याच्या लिलावांकडे पाठ फिरविली आहे. आजपर्यंत ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी तेंदूपत्त्याचा लिलाव आयोजित केला होता. मात्र एकाही कंत्राटदाराने हजेरी लावली नाही. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन अडचणीत आले आहे.
पेसा कायद्यांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जवळपास १ हजार २०० गावांना तेंदूपत्ता संकलनाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. यापैकी ५६ गावे वगळता उर्वरित सर्वच गावांनी स्वत:च तेंदूपत्ता खरेदी करण्याचा निर्णय यावर्षी घेतला. २०१६-१७ मध्ये तेंदूपत्ता संकलनाचे पहिले वर्ष असल्याने गावकऱ्यांना अनुभव नव्हता. त्यामुळे कंत्राटदाराच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तीन हजार ते पाच हजार रूपये प्रती स्टॅन्डर्ड बॅग (एक हजार तेंदूपुडा) दराने तेंदूपत्त्याची विक्री केली. वृत्तपत्रात जाहिरात देऊन तेंदूपत्त्याची विक्री झाल्यास अधिक किंमत मिळू शकते.
ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत येणाºया गावांमधील तेंदूपत्ता लिलावाची जाहिरात द्यावी, असे निर्देश दिले. त्यानुसार मागील वर्षी जाहिराती देण्यात आल्या. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. कंत्राटदारांमध्ये स्पर्धा होऊन तेंदूपत्त्याचा भाव प्रती स्टॅन्डर्ड बॅग १२ हजार ते २२ हजार रूपयांपर्यंत पोहोचला. याचा फार मोठा लाभ ग्रामसभांना मिळाला.
तेंदूपत्त्याच्या बाजारपेठेत प्रचंड मंदीचे सावट निर्माण झाले आहे. कंत्राटदारांनी मागील वर्षी चढ्या भावाने तेंदूपत्ता खरेदी केला होता. मात्र तेवढी किंमत बाजारपेठेत मिळाली नाही. पुढे भाव वाढतील या उद्देशाने तेंदूपत्ता साठवून ठेवला. मात्र मंदीचे सावट न हटल्याने भाव वाढू शकला नाही. परिणामी काही कंत्राटदारांचे गोदाम अजुनही तेंदूपत्त्याने भरून आहेत. त्यामुळे सदर कंत्राटदार यावर्षी तेंदूपत्ता खरेदी करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला मे महिन्याच्या शेवटी सुरूवात होणार आहे. १०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी जाहिरात काढून लिलाव आयोजित केला. मात्र लिलावाला एकही कंत्राटदार आला नाही. त्यामुळे तेंदूपत्त्याची विक्री झाली नाही. परिणामी ग्रामसभांना दुसऱ्यांदा लिलाव ठेवावा लागत आहे. दुसºयाही फेरीत कंत्राटदार हजेरी लावतील, याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे दिसून येत आहे.

वन विभागाला मिळाला गतवर्षीच्या तुलनेत केवळ १० टक्के दर
गडचिरोली वगळता विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तेंदूपत्त्याचे लिलाव झाले आहेत. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत केवळ १० टक्के भाव मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे १० युनिट आहेत. पहिल्या दोन राऊंडला एकाही कंत्राटदाराने निविदा भरली नाही. तिसºया वेळी एका युनिटसाठी केवळ एकाच कंत्राटदाराने निविदा भरली आहे. मागील वर्षी वन विभागाला पाच ते सात हजार रूपये प्रति स्टॅन्डर्ड बॅग भाव मिळाला होता. यावर्षी मात्र ४०० ते ५०० रूपये भाव मिळाला आहे. यामुळे वन विभागाचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

जिल्हाभरातील तेंदूपत्ता कंत्राटदार आले एकत्र
तेंदूपत्ता संकलन करणारे जेमतेम १५ ते २० कंत्राटदार आहेत. मागील वर्षी स्पर्धा होऊन चढ्या भावाने तेंदूपत्ता खरेदी करावा लागला होता. मात्र तेवढा भाव बाजारात न मिळाल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागले. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी यावर्षी सर्व कंत्राटदारांनी एकत्र येत पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये तेंदूपत्ता खरेदी न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. काही कंत्राटदार तर रॉयल्टीची रक्कम न देताच केवळ मजुरी देऊन तेंदूपत्ता खरेदी करण्यास तयार असल्याची माहिती पुढे आली आहे.
तेंदूपत्ता कंत्राटदार मजुरांच्या मदतीने तेंदूपत्ता तोडते. यातील सर्वच मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा करावी, असे शासनाचे निर्देश असले तरी सर्वच मजुरांकडे बँक खाते राहत नाही. त्याचबरोबर मजुरही रोखीने मजुरी घेण्यास पसंती दर्शवितात. मागील वर्षी वेलगूर येथील तेंदूपत्ता मजुरांना मजुरीची रक्कम देण्यासाठी नेली जात असताना पोलिसांनी आलापल्ली येथे कारवाई करून रोकड जप्त केली होती. त्यामुळे ही कंत्राटदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

Web Title: Tandupta business slowdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.