डाेंगरसावंगी गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:38 AM2021-04-04T04:38:02+5:302021-04-04T04:38:02+5:30
आरमोरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत डोंगरसावंगी येथे नळयोजना आहे. सदर नळयोजनेद्वारा गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र ...
आरमोरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत डोंगरसावंगी येथे नळयोजना आहे. सदर नळयोजनेद्वारा गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र ऐन उन्हाळ्यात पाणीपातळी खोल गेल्याने नळयोजनेच्या पाण्याची विहीर आटली आहे. त्यामुळे डोंगरसावंगी गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता पाणीटंचाईअंतर्गत सदर गावात नळयोजनेच्या विहिरीजवळ बोअर घेण्याचे काम मंजूर आहे. ग्रामपंचायतने वरिष्ठस्तरावर बोअर घेण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. तरीसुध्दा अजूनपर्यंत बोअर घेण्यात आलेले नाही. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाईची समस्या भासत आहे. गावात सार्वजनिक हातपंप व विहिरी आहेत. मात्र, पिण्यासाठी गावातील नागरिक नळयोजनेच्या पाण्याचा वापर करीत असतात. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून नळयोजनेची विहीर आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. जर विहिरीजवळ तात्काळ बोअर घेण्याचे काम झाल्यास गावात उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करता येईल व पाण्याची अडचण दूर होईल. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बोअर घेण्याचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. तात्काळ बोअर न घेतल्यास पाणीटंचाईची परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.