विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धेत तरूणाई जोशात धावली
By admin | Published: February 15, 2016 01:22 AM2016-02-15T01:22:22+5:302016-02-15T01:22:22+5:30
स्थानिक युवारंग स्पोर्ट अँड सोशीअल क्लबच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती निमित्ताने शहीद दिनाचे औचित्य साधून आरमोरी येथे विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धा रविवारी घेण्यात आली.
अशोक नेते यांचे प्रतिपादन : स्पर्धेत यश मिळविण्यासाठी सातत्य आवश्यक
आरमोरी : स्थानिक युवारंग स्पोर्ट अँड सोशीअल क्लबच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती निमित्ताने शहीद दिनाचे औचित्य साधून आरमोरी येथे विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धा रविवारी घेण्यात आली. या मॅराथॉन स्पर्धेत तरूणाई धावली. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी व तरूणाईने सातत्य बाळगावे. अपयशाला खचून न जाता अपयशातून पुन्हा यशाची तयारी करावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून खासदार अशोक नेते यांनी स्पर्धेचा शुभारंभ केला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार क्रिष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र बावनथडे, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद गवई, माणिक भोयर, प्रकाश अर्जुनवार, झामसिंग येरमे, भारत बावनथडे उपस्थित होते. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे यांनी युवक, युवतींना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यातील शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सदर मॅराथॉन स्पर्धा १८ वर्षाखालील पुरूष व महिला तसेच १८ वर्षाखालील मुले व मुली अशा चार गटात घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत बावणथडे, प्रा. दीपक गोंदोळे यांनी केले तर आभार स्वप्नील नरोटे यांनी मानले. यावेळी सत्यनारायण चकीनारपूवार, प्रा. हंसराज बडोले, प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
हे स्पर्धक ठरले विजयाचे मानकरी
विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटात आकाश शेंडे याने प्रथम, कोमल भोयर द्वितीय तर रितीक पंचबुध्दे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. १८ वर्षाखालील मुलींच्या गटात नागपूरची श्वेता कडाम प्रथम, दीक्षा तिजारे द्वितीय तर अश्विनी मोहुर्ले हिने तृतीय क्रमांक पटकाविला. १८ वर्षावरील पुरूष गटात चंद्रपूरचा पवन देशमुख याने प्रथम, चंद्रपूरचा मंगेश वाढई द्वितीय तर चंद्रपूरातीलच चेतन कोटेवार याने तृतीय क्रमांक पटकाविला. १८ वर्षावरील महिला गटात नागपूरची रश्मी गुरनुले प्रथम, आरमोरीची गिता वाटगुरे द्वितीय तर तृतीय क्रमांक चंद्रपूर येथील उषा लेडांगे यांनी पटकाविला. या सर्व विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषीक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.