टीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार निलंबित, बेकायदेशीर कामे केल्याचा ठपका
By दिगांबर जवादे | Published: August 8, 2023 10:34 PM2023-08-08T22:34:33+5:302023-08-08T22:34:44+5:30
प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्याबाबत महामंडळाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणारी धान खरेदी व मिलिंग यांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन रमेश कोटलावार यांना ८ ऑगस्ट रोजी निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश आदिवासी विकास महामंडळ, नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी काढले आहेत.
प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्याबाबत महामंडळाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने कोटलावार यांच्या कार्यपद्धतीवर अनेक आक्षेप घेतले. चौकशी समितीने आदिवासी विकास महामंडळाकडे अहवाल सादर केल्यानंतर महामंडळाने कोटलावार यांना निलंबित केले आहे.
धानाची मिलिंग करणाऱ्या मिलर्सला बँक गॅरंटीपेक्षा जादा डीओ देणे, राष्ट्रीयीकृत बँकेची गॅरंटी न घेता सहकारी बँकेची गॅरंटी घेऊन धान भरडाईस परवानगी देणे. धान भरडाईच्या तुलनेत विजेचा वापर झाला नाही, ही बाब संशयास्पद आहे. राइस मिलमध्ये विद्युत जाेडणी झाली नसतानाही भरडाईचा करारनामा करण्यात आला. डीओपेक्षा कमी प्रमाणात तांदूळ जमा करणे, नियमित डीओकरिता व सामायिक ताब्यातील धानाच्या डीओकरिता स्वतंत्र बँक गॅरंटी व अनामत रक्कम घेण्यात आली नाही.
धान खरेदी केंद्र मंजुरीपूर्वी पायाभूत सुविधांची खात्री न करणे, शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानाची देयके न देणे, बारदानाच्या रजिस्टर्डमध्ये दैनंदिन नाेंदी न करणे, बारदानाबाबत शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे, खराब झालेले धान पुन्हा पोत्यात भरणे, साठा रजिस्टरमध्ये आवक व जावक धानाच्या नाेंदी न करणे, धान जावक झाल्यानंतर साठा रजिस्टर व ऑनलाइन नोंदणी एकसमान नसणे, संस्थांना भेटी न देणे, धान ई-लिलावात विक्रीकरिता निश्चित करता साठा पुस्तकाप्रमाणे शिल्लक धान ई-लिलावात विक्रीसाठी न ठेवणे, आदी बाबी चाैकशी समितीला आढळून आल्या. त्यानुसार काेटलावार यांना निलंबित करण्यात आले. कोटलावार यांचे यवतमाळ येथे स्थानांतरण करण्यात आले आहे.