शिक्षक पात्रता परीक्षा जानेवारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:27+5:30
येणाऱ्या शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून बहुप्रतिक्षेत असलेली ही शिक्षक पात्रता परीक्षा १९ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संकेतस्थळावर या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उच्च प्राथमिक शिक्षक पदाच्या उमेदवारांना आता पदवीचा विषय घेणे बंधनकारक करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून बहुप्रतिक्षेत असलेली ही शिक्षक पात्रता परीक्षा १९ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.
यासंदर्भात संकेतस्थळावर या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उच्च प्राथमिक शिक्षक पदाच्या उमेदवारांना आता पदवीचा विषय घेणे बंधनकारक करण्यात आले. पहिली ते आठवीपर्यंत शिकविण्यासाठी पहिला व दुसरा असे दोन्ही पेपर उत्तीर्ण होणे सक्तीचे करण्यात आले आहे. शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी करण्यासाठी सन २०१३ पासून टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. १५ जुलै २०१८ नंतर टीईटीची एकही परीक्षा झाली नाही. सदर परीक्षेला परवानगी मिळावी, यासाठी परीक्षा परिषदेकडून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला ऑक्टोबर महिन्यात मान्यता मिळाली. शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे.
सहावी ते आठवीच्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी परीक्षेतील दुसरा पेपर उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. आता शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असल्याने भावी शिक्षक उमेदवार परीक्षेच्या तयारीला लागणार आहेत.
टीईटी परीक्षा १५० गुणांची असून यात १५० वस्तूनिष्ठ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न एक गुणासाठी विचारला जातो. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला ९० गुण म्हणजे ६० टक्के गुण घेणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांना ८३ गुण म्हणजे ५५ टक्के गुण घेणे आवश्यक आहे. टीईटी परीक्षेमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, मराठी, इंग्रजी व्याकरण, गणित, परिसर अभ्यास आदी विषयांवरील प्रश्नांचा समावेश असतो. यासाठी अनेक संदर्भ पुस्तके डीएड् व बीएड् विद्यार्थ्यांना वाचावी लागतात.
२८ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे बहुप्रतीक्षित वेळापत्रक जाहीर झाले असून शासनाच्या मान्यतेनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी परीक्षा १९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेसाठी ८ नोव्हेंबरपासून २८ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेचा पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत होणार असून दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे. ४ ते १९ जानेवारीदरम्यान टीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थी आता कामाला लागणार आहेत.