समायोजनासाठी शिक्षकांची उसळली गर्दी
By admin | Published: March 20, 2017 01:23 AM2017-03-20T01:23:28+5:302017-03-20T01:23:28+5:30
पदवीधर शिक्षक व विषय शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आली होती.
एक हजार शिक्षकांचे समायोजन : सोमवारीही चालणार प्रक्रिया
गडचिरोली : पदवीधर शिक्षक व विषय शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आली होती. या समायोजन प्रक्रियेला जिल्हाभरातून हजारो शिक्षक उपस्थित होते. त्यामुळे जिल्हा परिषद हायस्कूलच्या परिसरात शिक्षकांची मोठी गर्दी दिसून येत होती.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपशिक्षणाधिकारी एम. एन. चलाख, सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शनिवारी मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात आले. त्यानंतर पदवीधर शिक्षक व विषय शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारी राबविण्यात आली. सदर प्रक्रिया सोमवारी सुध्दा चालू राहणार आहे. उच्च शिक्षणासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेताच ज्या शिक्षकांनी शिक्षण घेतले आहे. अशा शिक्षकांचेही नावे पदवीधर शिक्षकांच्या यादीत असल्याने काही शिक्षक संघटनांनी यावर आक्षेप नोंदविला होता. सदर यादी रद्द करावी, समायोजनाची प्रक्रिया पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. मात्र शिक्षण विभागाने समायोजनाची प्रक्रिया नियोजीत वेळेप्रमाणे व यादीप्रमाणे पुढे चालू ठेवली. जवळपास एक हजार शिक्षकांचे समायोजन केले जाणार होते. यासाठी सेवाज्येष्ठतेत एक ते हजारपर्यंतच्या शिक्षकांना बोलाविण्यात आले होते. जिल्हाभरातून हजारो शिक्षक समायोजनाच्या प्रक्रियेला उपस्थित होते. रात्री उशीरापर्यंत समायोजनाची प्रक्रिया सुरू होती. सेवाज्येष्ठतेनुसार प्रत्येक शिक्षकाला बोलावून त्याच्यासमोर रिक्त असलेल्या जागांची यादी दाखविली जात होती. त्यानंतर समायोजन केले जात होते. बंगाली माध्यमांच्या शाळांमध्ये अनेक मराठी माध्यमांचे शिक्षक कार्यरत होते. त्या शिक्षकांना काढून बंगाली माध्यमातून शिक्षण झालेल्या शिक्षकांना बंगाली माध्यमाच्या शाळेवर नेमण्यात आले. (नगर प्रतिनिधी)