दुचाकीच्या धडकेने शिक्षक गंभीर जखमी
By admin | Published: March 29, 2017 02:15 AM2017-03-29T02:15:48+5:302017-03-29T02:15:48+5:30
सायंकाळच्या सुमारास गोदावरी नदी पुलाकडे फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने
सिरोंचा : सायंकाळच्या सुमारास गोदावरी नदी पुलाकडे फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. रमन किष्टय्याजी कोमेरा रा. सिरोंचा असे जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
सिरोंचा येथील राजे धर्मराव विद्यालयातील शिक्षक रमन कोमेरा हे राजेश ओल्लालवार यांच्यासोबत मंगळवारी सायंकाळी ७ वाजता गोदावरी नदी पुलाकडे फिरण्यासाठी पायी गेले होते. ते दोघेही परत येत असताना समय्या जकलू अडुरी (२५) रा. नगरम यांच्या भरधाव दुचाकीने रमन कोमेरा यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे कोमेरा हे गंभीर जखमी झाले. त्यांना सर्व प्रथम सिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आशिष डोळसकर यांनी कोमेरा यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर कोमेरा यांना तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथील रूग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात दुचाकीस्वार समय्या जकुलू अडुरी व मागे बसलेला जपय्या पोचम चिलमुला (३०) रा. धर्मपूरी हे दोघे किरकोळ जखमी झाले. रमन कोमेरा यांच्या डोक्याला व दोन्ही पायांना गंभीर इजा झाली आहे. अपघात करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिकारी विलास सुपे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास दुधे मेजर करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)